लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका विकासातून पुढे नेला


युवक काँग्रेसच्या युवा संगम कार्यक्रमात संवाद

संगमनेर । झुंझार न्यूज

सहकारमहर्षी भाऊसाहेबथोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. लोकनेते बाळासाहेबथोरात यांनी शेती, शिक्षण, सहकार, दुग्धविकास, आर्थिक समृद्धीतून हा तालुका विकासातून पुढे नेला. युवकांनी इतिहास कधीही विसरू नाही असे सांगताना युवक काँग्रेसचा हा कार्यक्रम इतिहासाचे मार्गदर्शन घेऊन भविष्याची दिशा ठरवणारा असल्याचे गौरवउद्गार विधिमंडळ पक्षाचे गटनेते माजी मंत्री आमदारसतेजपाटील यांनी काढले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने आयोजित युवा संगम कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.प्रदेशाध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर सौ.दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास दादा पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे,प्रवक्ते हनुमंत पवार, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, राज्य उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन, ऋषिकेश पाटील, बालाजी गाडे, संग्राम खोपडे, आयोजक तालुकाध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, गिरीजा पिचड, राहुल उगले,अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे,निखिल पापडेजा, शेखर सोसे, सुभाष सांगळे आदींसह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या युवा संवाद कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री आ.सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे शेती, सहकार, शिक्षण, आर्थिक समृद्धी अशा सर्व क्षेत्रांमध्ये राज्याला दिशा देत आहे. आपल्या राज्याला आणि देशाला मोठा समृद्ध इतिहास आहे. अनेक राष्ट्रपुरुषांनी हा देश स्वातंत्र्य केल्यानंतर आज स्वकर्तृत्वातून जगापुढे उभा करण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे. त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे. हा चांगला इतिहासाचा वारसा घेऊन आपल्याला देश घडवायचा आहे. भाजप प्रणित आघाडी काँग्रेसचा विचार मोडीत काढण्यासाठी सर्व उपाय करत आहेत. खोटा इतिहास आणि माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पसरवली जात आहे. प्रसार माध्यमांवर अनेक निर्बंध घातले आहेत. सोशल मीडिया ताब्यात घेतला आहे.

काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन पुढे जात आहे. आमचा राम आम्हाला दाखवण्याची गरज नाही कारण तो हृदयात आहे. मात्र भाजप कडून देवतांचे राजकारण केले जात आहे. महाराष्ट्रात 4000 कोटींचे ड्रग्स पकडले आहे. तरुण पिढी बिघडवण्यासाठी हे षड्यंत्र उभारले जात आहे. संगमनेर तालुक्यात एका बाजूला सुसंस्कृत आणि सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व आहे. तर दुसऱ्या बाजूला दादागिरी आणि अशांतता वाढवणारे नेतृत्व आहे. तालुक्यातील सर्वांना चूक लक्षात आली असून आता सर्वांनी भूतकाळातील झालेला अपघात विसरून भविष्य घडवण्यासाठी एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

तर माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 2024 च्या घटनेने राज्य हळहळले. आपत्ती मधून इष्टापत्ती निर्माण करायची असते. नव्याने सर्वांना बरोबर घेत पुढे जायचे आहे. तालुक्याची दिशा ठरवायचे आहे. सामान्य माणसाच्या हिताचा विचार करून जे काम करतात त्यांच्या पाठीशी गोरगरिबांची ताकद असते.आपण हिंदू आहोत.पण दुसऱ्याचे द्वेष करणारे नाही. संत आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आणि राज्यघटनेचे विचार आपल्या सर्वांना पुढे न्यायचे आहे. पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर,तुकाराम यांना त्रास देणारी मुंबाजी प्रवृत्ती आजही आहे. निवडणूक आयोग, न्यायालय, ईडी,सीबीआय या संस्था स्वायत्त आहे की नाही हा मोठा प्रश्न असून देश चुकीच्या दिशेने चालला आहे देश वाचवण्यासाठी युवकांनी आता पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, संगमनेरने आमच्यावर कायम प्रेम केले. निळवंडे धरणाचे पाणी थोरात साहेबांमुळे या भागाला मिळाले असून काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवनात अपघात घडतात. मात्र त्यांनी खचून न जाता लढण्यासाठी तयार राहा असे आवाहन केले. यावेळी सागर साळुंखे, सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन यांनीही मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांची प्रकट मुलाखत संपन्न झाली. युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.


लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचे पालकमंत्रीपद आपल्याला दिले



काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आपले नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये लातूरचे पालकमंत्री पद मला दिले. लातूरची जनता सांगायची की थोरात साहेब शांत संयमी होते. मी थोडा आक्रमक आहे. याचबरोबर त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद दिले होते. तेव्हा थोरात साहेब यांनी आग्रहाने कोल्हापूरचे पालकमंत्री पद मला दिले. कार्यकर्त्यांना बळ देणारे हे नेतृत्व असल्याचे माजीमंत्री आमदार बंटी पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *