आमदार सत्यजीत तांबे यांचा २५ मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

 

 

पुणे । झुंझार न्यूज

 

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील वाढती अंधाधुंदी, प्रशासकीय कामांमधील गोंधळ आणि उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष यावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “शिक्षण विभागाचा हा बोगस कारभार आता खपवून घेतला जाणार नाही,” अशा शब्दांत इशारा देत त्यांनी येत्या २५ मे २०२६ पासून पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

आमदार तांबे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर बोट ठेवले आहे.

आमदार तांबे यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, नाशिक पदवीधर मतदारसंघातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्राची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्यात अविश्वासाचे वातावरण असून संपूर्ण यंत्रणा दिशाहीन झाली आहे. किरकोळ कामांसाठीही एसीआयटी (ACIT) चौकशीचे कारण पुढे करून फाईल्स प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा

शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढताना आमदार तांबे म्हणाले की, “अनेक प्रश्न हे आर्थिक नसून केवळ प्रशासकीय नियोजनाशी संबंधित आहेत. मात्र, प्रत्येक वेळी अर्थसंकल्पाचे कारण सांगून टाळाटाळ केली जाते. शिक्षकांना अध्यापनाचे मुख्य कार्य सोडून जनगणना, मतदार नोंदणी, बीएलओ यांसारख्या कामांत गुंतवले जात आहे. शाळांमध्ये आता गुणवत्तेपेक्षा केवळ अहवालबाजी आणि लेखापरीक्षणाला महत्त्व दिले जात असून, हे शिक्षण क्षेत्रासाठी घातक आहे.”
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठकीची मागणी
या समस्यांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी आमदार तांबे यांनी शिक्षण आयुक्तांकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत

१. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यासाठी अंतर्गत बैठक घ्यावी.
२. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे उत्तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी, उपसंचालक, शिक्षक संघटना, संस्थाचालक आणि पालक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर दीर्घकालीन निर्णय घ्यावेत.


जर मे महिन्यातील नियोजित बैठकीत ठोस निर्णय झाले नाहीत, तर २५ मे २०२६ पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे. “जोपर्यंत प्रश्न निकाली निघत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांच्यासाठी आंदोलन हे नवीन नाही. वयाच्या १८ व्या वर्षापासून विविध सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींत ते सक्रिय आहेत. मग तो जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न असो किंवा विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा विषय, तांबे यांनी नेहमीच रस्त्यावरची लढाई आणि विधिमंडळातील पाठपुरावा अशा दोन्ही आघाड्यांवर यश मिळवले आहे. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी त्यांनी शिक्षण विभागाविरुद्ध शड्डू ठोकला आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed