एजंटगिरी आणि फसवणुकीवर आ. खताळ यांचा इशारा; दोषींवर कठोर कारवाई ठरलेली
संगमनेर । झुंझार न्यूज
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विकासकामांना खऱ्या अर्थाने वेग आला आहे. यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत सर्वाधिक प्रवेश होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण पक्षात दाखल होत असून, संगमनेरमध्येही लवकरच मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ होणार आहे. काही प्रमुख नेत्यांचे प्रवेश हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तालुक्यातील विविध विषयांवर बोलताना आमदार खताळ यांनी वडगावपान येथील दत्तधाम प्रकरणावर गंभीर आरोप केले. दत्तधाम सरकार जनतेची आर्थिक फसवणूक करून त्यांना वेठीस धरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत कोणी तक्रार देण्यास पुढे आल्यास पोलीस प्रशासन निश्चितच कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, चावडी येथील तलाठी कार्यालयातील एजंटगिरीचा पर्दाफाश झाल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला कठोर सूचना दिल्या. नागरिकांकडून पैसे घेऊन कागदपत्रांवर सही व शिक्के मारण्याचा प्रकार गंभीर असून, संबंधित तलाठी, कर्मचारी आणि एजंटवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मनुष्यबळाची कमतरता असल्यास ती भरून काढावी, मात्र नागरिकांची लूट होऊ देऊ नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.
यापुढे संबंधित एजंट पुन्हा कार्यालयात आढळल्यास त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशाराही आमदार खताळ यांनी दिला. अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. समाजात अशा कृत्यांना कोणताही थारा दिला जाऊ नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
जनतेच्या हक्कांसाठी ठाम भूमिका…
“तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये कोणताही एजंट नागरिकांची फसवणूक करत असेल, पैसे उकळत असेल किंवा शासकीय कामात बेकायदेशीर हस्तक्षेप करत असेल, तर त्याच्यावर कठोर आणि तातडीने कारवाई केली जाईल. नागरिकांना वेठीस धरण्याचा किंवा त्यांची आर्थिक लूट करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तसेच, अशा एजंटांना पाठीशी घालणारे अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्यांनाही वाचवले जाणार नाही. प्रशासनाने पारदर्शक आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई अटळ असेल.”