संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

मंदिराचा जीर्णोद्धार तसेच परिसरात विकसित होत असलेल्या बिबट सफारी प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानचा परिसर तालुक्यातील मुख्य पर्यटन केंद्र ठरेल,” असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रवरा बँकेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अमरजित पवार यांच्यासह मंदिराच्या विश्वस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

“निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीची कमतरता भासणार नाही, परंतु लोकांचा सहभागही यामध्ये राहिला पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, “हे देवस्थान आता भाविकांसाठी श्रद्धेचे मुख्य केंद्र झाले आहे. मागील काळात मंदिराच्या परिसरात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. भविष्यात मंदिराचे काम पूर्ण होईल, त्यावेळी या तीर्थस्थानाची भव्यता अधिक वाढेल.”

 

“या परिसरात असलेल्या वन विभागाच्या जागेवर बिबट सफारी प्रकल्प उभारण्यात येत असून, याचा आराखडाही आता तयार झाला आहे. बिबट सफारी प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्याही या भागात वाढेल. मध्यंतरी राजस्थान सरकारने उभारलेल्या काही व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली, त्या प्रकल्पांच्या धर्तीवरच या परिसरातही असे प्रकल्प सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पर्यटन वाढल्यामुळे या भागात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आमदार अमोल खताळ म्हणाले की, “तालुक्यातील विविध विकासकामांसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होत आहे. या विकास प्रक्रियेला पालकमंत्री ना. विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, तालुक्यातील देवस्थानांच्या परिसर विकासासाठी निधी उपलब्ध होत असल्यामुळे तालुक्यातील तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या कामाला चांगली गती मिळाली आहे. श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानचा परिसर भविष्यात विकास प्रक्रियेचे एक मुख्य केंद्र ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed