हॉटेलच्या मेनूकार्डवर आता पनीर आणि ‘अ‍ॅनालॉग’चा फरक स्पष्ट करावा लागणार; १ मे २०२६ पासून कडक अंमलबजावणी

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या बनावट पदार्थांना चाप बसणार असून, नागरिकांनी केवळ शुद्ध दुधापासून तयार केलेल्या पनीरचीच मागणी करावी, असे आवाहन संगमनेर तालुका (राजहंस) दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.

 

 

अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच एक पत्रक जाहीर केले असून, त्याची अंमलबजावणी १ मे २०२६ पासून अनिवार्य करण्यात आली आहे. या नियमानुसार, हॉटेल व्यावसायिक आणि मिठाई विक्रेत्यांना त्यांच्या ‘मेनूकार्ड’ आणि ‘बिलावर’ पनीरचा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी दुधाऐवजी वनस्पती तेलाचा वापर करून ‘अ‍ॅनालॉग पनीर’ (बनावट पनीर) विकले जाते. आता ग्राहकांना ते नेमके काय खात आहेत, हे कळावे यासाठी मेनूकार्डवर शुद्ध पनीर आणि वनस्पती तेलापासून बनवलेले पनीर असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असेल.
किंमतीतील तफावत आणि ग्राहकांची फसवणूक
या निर्णयाचे स्वागत करताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, बाजारपेठेत शुद्ध दुधाच्या पनीरची किंमत अंदाजे ३५० रुपये आहे, तर बनावट किंवा अ‍ॅनालॉग पनीर १८० ते २०० रुपये किलोने उपलब्ध होते. स्वस्त मिळत असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना पनीर सांगून बनावट पदार्थ खायला घालतात. यामुळे ग्राहकांची केवळ आर्थिक फसवणूकच होत नाही, तर त्यांच्या आरोग्याशीही खेळ केला जातो.

 

 

भेसळयुक्त पनीरच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकताना देशमुख यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी नैसर्गिक दुधाचा वापर न करता वनस्पती तेल, डिटर्जंट आणि हानिकारक रसायनांचा वापर करून ‘सिंथेटिक पनीर’ बनवले जाते. हे पनीर दिसायला पांढरे शुभ्र असले तरी त्याचे सेवन केल्यास यकृत (Liver) आणि किडनीचे गंभीर आजार होऊ शकतात. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे.

जर ग्राहकांनी शुद्ध पनीरचा आग्रह धरला, तर त्याचा थेट फायदा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. बनावट पनीरची विक्री थांबल्यास नैसर्गिक दुधाची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल. डेअरी उद्योगाच्या वतीने या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे.

पनीर हा शाकाहारी नागरिकांच्या प्रथिनांचा (Protein) मुख्य स्रोत आहे. मात्र, भेसळीमुळे शुद्ध शाकाहारी ग्राहकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत होते. नव्या निर्णयामुळे हॉटेलमध्ये जेवताना ग्राहकांना आपण काय खात आहोत याची स्पष्टता मिळेल.


रणजितसिंह देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हॉटेलमध्ये किंवा दुकानात पनीर खरेदी करताना ते शुद्ध असल्याची खात्री करावी. कुठेही भेसळ आढळल्यास तत्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी. तसेच, अन्न व औषध प्रशासनाने ही मोहीम केवळ सणासुदीपुरती मर्यादित न ठेवता वर्षभर राबवावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed