औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी आमदार खताळांचा मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा
संगमनेर । झुंझार न्यूज
वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे १० कोटी रुपयांचा प्रस्तावित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. औद्योगिक वसाहतीची सद्यस्थिती गांभीर्याने घेत मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, निधी उपलब्धतेसाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेना पक्षाचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी ७ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी तसेच जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. दरम्यान, संगमनेर मतदारसंघातील विविध राजकीय, सामाजिक आणि विकासासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मंत्री सामंत यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे उद्योग मंत्री सामंत यांचे लक्ष वेधले. औद्योगिक वसाहतीचा विकास आराखडा अद्याप तयार करण्यात आला नसून पायभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वीजपुरवठा तसेच आपत्ती व्यवस्थापन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे तेथील उद्योजक आणि कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था आणि पथदिवे यांची गरज भासत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे महत्वाचे असून उद्योजकांना मोकळ्या आणि सुरक्षित वातावरणात व्यवसाय करता यावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार खताळ यांनी उद्योग मंत्री सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यासंदर्भात वर्षानुवर्ष सत्ताकेंद्र असलेल्या संचालक मंडळाकडून कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
संगमनेर औद्योगिक वसाहतीच्या विकास निधीसाठी यापुर्वी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून ७ ऑक्टोबर २०२५ रोजी उद्योग केंद्र, अहिल्यानगर यांनी आवश्यक असलेल्या १० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागीय कार्यालय, अहिल्यानगर यांच्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावाला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सहकारी औद्योगिक वसाहतीचा विकास हा संगमनेरच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया आहे. अनेक वर्ष प्रलंबित विकासकामांना मंजुरी मिळाल्यास संगमनेर औद्योगिक वसाहत आधुनिकतेकडे वाटचाल करत सुरक्षित आणि सुसज्ज रोजगारनिर्मितीचे नवे केंद्र बनेल असा विश्वास आहे.