झरेकाठी । झुंझार न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि परिसरातील शेतीपंपांच्या खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या कडक सूचनांनंतर, महावितरणने या परिसरात ८ तास अखंडित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

जोर्वे परिसरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून शेतीपंपाच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त होते. पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने पिके जळण्याची भीती निर्माण झाली होती. या गंभीर समस्येबाबत भाजप मंडळ अध्यक्ष गोकुळ दिघे यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांची अडचण मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.

 

गोकुळ दिघे यांच्या निवेदनाची दखल घेत ना. विखे पाटील यांनी संगमनेर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले. “जोर्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन बैठक घ्या आणि हा प्रश्न तातडीने सोडवा,” अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या.

 

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. वट्टमवार यांनी जोर्वे परिसरात शेतकरी, भाजपा मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे, राहुल दिघे, बाळासाहेब शिंदे, विलासराव मोरे, गणपत शिंदे, कैलास गुंजाळ, मदन देशमुख, संतोष भुजबळ, आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भाजप मंडळ अध्यक्ष गोकुळ दिघे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी मांडल्या.

 

या बैठकीत कार्यकारी अभियंता वट्टमवार यांनी खालील महत्त्वाच्या बाबींची ग्वाही दिली

१. ८ तास अखंडित वीज: शेतीपंपांसाठी दररोज कोणताही अडथळा न येता सलग ८ तास वीज पुरवठा केला जाईल.
२. मेंटेनन्सचे काम बंद: या ८ तासांच्या वीज पुरवठ्याच्या काळात कोणत्याही प्रकारचे ‘परमिट’ (शटडाऊन) घेतले जाणार नाही किंवा देखभालीचे (मेंटेनन्स) काम केले जाणार नाही.
३. लाईनमनची उपस्थिती अनिवार्य: थ्री फेज वीज पुरवठा सुरू असताना संबंधित लाईनमनने गावात हजर राहणे बंधनकारक असेल. यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास तो तात्काळ दुरुस्त करून वीज पुरवठा पूर्ववत करता येईल.

महावितरणने दिलेल्या या ठोस आश्वासनामुळे जोर्वे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांची ही जुनी मागणी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आणि तत्काळ तोडगा काढल्याबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे जोर्वे परिसरातील पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी विशेष अभिनंदन व आभार मानले आहे .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed