आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने चिमुकल्यांची भव्य दिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या मनमोहक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी अवघ्या शिबलापूरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भक्ती मार्गासोबतच पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश दिला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी या दिंडीचे आयोजन केले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषात ही दिंडी संपूर्ण गावातून काढण्यात आली. वारकरी वेषात नटलेले चिमुकले, हातात भगव्या पताका आणि पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन सहभागी झाले होते.
या प्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ. संजय सांगळे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कारांसोबतच सामाजिक भान निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
या दिंडी सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालवारकऱ्यांचे स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला. भक्ती आणि समाजप्रबोधनाचा हा संगम पाहून लोकांनी शाळेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.