पुणे-नाशिक महामार्गावरील प्रलंबित कामे ७ दिवसांत सुरुवात होणार
आश्वी । झुंझार न्यूज
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. महामार्ग प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास महिनाभरानंतर थेट आत्मदहन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी प्रशासनाला दिला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक दिशादर्शक फलक लावणे, रिफ्लेक्टर्स बसवणे, स्ट्रीट लाईट्स कार्यान्वित करणे, सर्व्हिस रोडची दुरवस्था सुधारणे आणि बोगद्यांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणे या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच, महामार्गावरील जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावेत आणि रायतेवाडी फाट्यावरील पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) कार्यकारी अधिकारी श्री. घंटे, दिलीप शिंदे, आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सकारात्मक चर्चेनंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले.
या आश्वासनानुसार, पुढील ७ दिवसांत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी सर्व प्राथमिक कामे पूर्ण केली जातील. तसेच, रायतेवाडी फाट्यावरील पुलाचे प्रलंबित काम येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि उपोषण सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य जनार्दन आहेर, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई राऊत, महिला शहराध्यक्ष सरलाताई भुजबळ, अक्षय भालेराव, रईस पठाण, मनीष माळवे, अमोल म्हस्के, दिनेश दफेदार, संतोष भुजबळ, गौरव वाळे, नितीन अहिरे, प्रसाद काटे, भाऊ म्हस्के, ज्ञानेश्वर माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या शब्दामुळे तूर्तास हे आंदोलन मिटले असले, तरी आता सर्वांचे लक्ष महामार्गावरील प्रत्यक्ष कामांकडे लागले आहे.
पुन्हा आंदोलन नाही, आता थेट आत्मदहन!
प्रशासनाच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे व विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गजानन भोसले यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते मागे घेतले. मात्र, यावेळी बोलताना प्रवीण कानवडे यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला. “आम्ही प्रशासनाला वेळ दिला आहे, पण जर दिलेल्या मुदतीत कामांना गती मिळाली नाही किंवा आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर महिनाभरानंतर पुन्हा उपोषण करणार नाही, तर थेट आत्मदहन करू,” असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला.