कर्जमाफीचे पहिले पत्र देऊन सरकारने दिली शब्दाला जाग

अहिल्यानगरची यादी लवकरच जाहीर होणार

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 


राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, महाराष्ट्र जलसमृद्ध व्हावा आणि बळीराजाची सेवा करण्यासाठी अधिक शक्ती मिळावी, अशी प्रार्थना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूर येथे श्री पांडुरंगाच्या चरणी केली. आषाढी वारीच्या निमित्ताने विखे पाटील कुटुंबीयांनी आपली वारकरी सेवेची परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवली.

आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्त मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विठूरायाकडे राज्याच्या कल्याणासाठी साकडे घातले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा


यावेळी पत्रकारांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या पावन भूमीत कर्जमाफीचे पहिले पत्र देऊन सरकारने आपल्या वचनपूर्तीचा श्रीगणेशा केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जमाफीची यादीही लवकरच प्रसिद्ध होईल आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.” वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद सरकारसोबत असल्यानेच शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा देणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विखे पाटील परिवाराकडून वारकरी सेवा


दरवर्षीप्रमाणे यंदाही विखे पाटील परिवाराने पंढरपूर येथे उभारलेल्या मठामध्ये वारकऱ्यांसाठी निवासाची व भोजनाची चोख व्यवस्था केली होती. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः मठामध्ये जाऊन जिल्ह्यातील विविध दिंड्यांमधून आलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती.

पाणी नियोजन आणि ‘चरणसेवा’ उपक्रम


यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असूनही जलसंपदा विभागाने चोख नियोजन करून उजनी धरणातून वारीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. ना. विखे पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री असताना सुरू केलेला ‘अहिल्यानगर-सोलापूर नियोजन पॅटर्न’ आता अधिक व्यापक झाला असून, यंदापासून सुरू झालेला ‘चरणसेवा’ हा उपक्रम वारकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपुरात आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *