सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय संशोधन केंद्रातर्फे आशाबाई भाऊसाहेब वर्पे यांना गुरुवारी (दि. २३) विद्या वाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. वर्पे या उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) येथील प्रगतशील शेतकरी वेणुनाथ सोन्याबापू सारबंदे यांच्या सुनबाई आणि गणेश वेणुनाथ सारबंदे यांच्या पत्नी आहेत.
आशाबाई वर्पे यांनी ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी उत्पादकतेवर होणाऱ्या परिणामांचा चिकित्सक अभ्यास’ (विशेष संदर्भ – पश्चिम महाराष्ट्र) या समकालीन आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या विषयावर आपले संशोधन कार्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे. यासाठी त्यांना डॉ. अजयकुमार पालवे यांच्यासह प्राचार्य डॉ. बाबासाहेब वाघ, डॉ. सुहास आव्हाड, डॉ. प्रमोदिनी कदम, डॉ. शोभा राहणे, डॉ. गणेश वाळुंज यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, एका सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेने उच्च शिक्षण घेत संशोधन क्षेत्रात मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरले असून, उंबरी बाळापूर पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.