पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत‘ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांना बळ देणारी एक मोठी घडामोडी अहिल्यानगर जिल्ह्यात घडत आहे. शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा आता देशाच्या संरक्षण नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
प्रतिवर्षी ५ लाख तोफगोळ्यांची निर्मिती
शिर्डी येथील या भव्य प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन केले जाणार आहे. या कारखान्याची क्षमता प्रतिवर्षी ५ लाख तोफगोळे तयार करण्याची असून, खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वात मोठी क्षमता आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी लागणारे संपूर्ण तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी आहे. अवघ्या एक वर्षाच्या विक्रमी वेळेत हा प्रकल्प उभारून कार्यान्वित करण्यात आला आहे.
१००० कोटींची गुंतवणूक आणि हजारो रोजगार
शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे २०० एकर क्षेत्रावर हा संरक्षण प्रकल्प विस्तारलेला आहे. यात केवळ तोफगोळेच नव्हे, तर रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधाही विकसित केल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी १००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यापैकी ६०० कोटींची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे २ हजार नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. याच दिवशी प्रतिदिन १५ टन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचेही लोकार्पण केले जाणार आहे.
श्रीगोंद्यात उभारणार भव्य दारूगोळा संकुल
जिल्ह्यातील संरक्षण क्षेत्राचा विस्तार केवळ शिर्डीपुरता मर्यादित नसून, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे ६०० एकर जागेवर भव्य दारूगोळा निर्मिती संकुल उभारले जात आहे. येथे TNT, RDX आणि HMX सारखी स्फोटके तयार केली जातील. यासाठी अतिरिक्त २००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, वर्षाला २० हजार टन TNT उत्पादनाची क्षमता येथे निर्माण होईल. शिर्डीत तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके भरण्याचे महत्त्वाचे काम याच बेलवंडी येथील कारखान्यात केले जाणार आहे.
कौशल्य विकासावर भर आणि संरक्षण प्रदर्शन
स्थानिक तरुणांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्याने २०० कोटी रुपये खर्चून औद्योगिक वसाहतीत ‘इनोव्हेशन सेंटर’ सुरू करण्यात येत आहे. तसेच, संरक्षण क्षेत्रातील संधींची माहिती देण्यासाठी २३ आणि २४ मे रोजी शिर्डीत भव्य ‘संरक्षण प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे. यात देशातील १०० हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) सहभागी होणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्याला लाभलेली रणगाडा प्रशिक्षण केंद्र आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्रीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आता या नव्या प्रकल्पांमुळे अधिक समृद्ध होणार आहे. “हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल आणि सुमारे ५ हजार तरुणांना रोजगाराची दारे उघडतील,” असा विश्वास पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.