थोरात-पुणे रेल्वेबाबत माजी महसूल मंत्र्यांचा घणाघात
साकुर येथे ऊस विकास मेळाव्यात साधला संवाद
संगमनेर । झुंझार न्यूज
“चाळीस वर्षांच्या प्रवासात आम्ही कष्टातून संगमनेर तालुका विकासाच्या शिखरावर नेऊन ठेवला. मात्र, ज्यांना तालुक्याचा हा विकास पहावत नाही, अशा लोकांनी राजकीय हेतू समोर ठेवून नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलला आहे. साकुर मार्गे जाणारा हा सरळ मार्ग पळवण्यात आला असून, तालुक्यात सध्या सुरू झालेली हप्तेखोरी आणि टक्केवारी हा अत्यंत चिंतेचा विषय आहे,” अशी बोचरी टीका माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

साकुर येथील वीरभद्र लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ‘ऊस विकास मेळाव्यात’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, सभापती शंकरराव खेमनर, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. सुशील कपिल, डॉ. समाधान सुरवसे, इंद्रजीत थोरात यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

थोरात पुढे म्हणाले की, “नाशिक-पुणे रेल्वे मार्ग साकुर मार्गे जाणार होता, जो या भागासाठी वरदान ठरणार होता. त्यासाठी जमिनीचे अधिग्रहण होऊन शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपयांचे वाटपही झाले होते. त्यावेळी ‘जीएमआरटी’चा कोणताही अडथळा नव्हता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हा मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. आता या हायस्पीड रेल्वेऐवजी गुजरातला प्राधान्य दिले जात असल्याच्या शंका येत आहेत. हा रेल्वे मार्ग संगमनेरच्या कृषी, शिक्षण आणि रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो पुन्हा मिळवण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”
“आम्ही २०२४ मध्ये तालुक्यासाठी अनेक रस्त्यांची कामे मंजूर केली होती, मात्र सत्तेवर आलेल्या लोकांनी ही कामे रद्द केली. जे आता कामांच्या गप्पा मारत आहेत, त्यांनीच विकास रोखण्याचे काम केले आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. तालुक्यात सध्या वाढलेल्या हप्तेखोरीच्या संस्कृतीबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कारखान्याच्या वाटचालीबाबत बोलताना थोरात म्हणाले की, संगमनेरमधील सहकारी संस्थांनी राज्यात आदर्श निर्माण केला आहे. यंदा कारखान्याने १५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुशील कपिल (शास्त्रज्ञ) म्हणाले की , ऊस बेणे बदलणे काळाची गरज आहे. CO २६५ ची उत्पादकता घटली असून, त्याऐवजी ८६०३२ ही जात अधिक फायदेशीर आहे. या जातीला फुटवे जास्त असून खोडवा पीकही चांगले येते.

डॉ. समाधान सुरवसे म्हणाले की , जास्त पाणी आणि खतांच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षण करून दक्षिण-उत्तर पद्धतीने लागवड करावी.
या कार्यक्रमाला इंद्रजीत खेमनर, रामदास धुळगंड, मीराताई शेटे, नवनाथ आरगडे, रामनाथ कुटे, सतीश वर्पे, दिलीप नागरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह साकुर परिसरातील शेतकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले.
६५ वर्षीय गंगुबाईंनी बिबट्याला नमवले!
या मेळाव्यात खरशिंदे येथील गंगुबाई शिवराम गायकवाड या ६५ वर्षीय आजींचा बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. गंगुबाईंनी आपल्या घरात घुसलेल्या बिबट्याला अत्यंत धैर्याने जेरबंद केले होते. त्यांच्या या अचाट साहसाचे कौतुक करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.



