जवळेकडलग येथे एसकेएफ वॉलचा शुभारंभ, थोरात कारखान्याच्या पुढाकारातून गावतळी भरली
माजी मंत्री थोरात यांच्यामुळे कालव्यांमधून निळवंडेचे पाणी – पांडुरंग पा.घुले
संगमनेर । झुंझार न्यूज
निळवंडे धरण व कालवे निर्माण करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना अनंत अडचणी आल्या. मात्र त्यांनी जीवनाचे ध्येय मानून त्या सर्व अडचणी सोडविल्या आणि धरण व दोन्ही कालवे पूर्ण केले. ज्यांनी या काळात कोणतेही योगदान दिले नाही किंवा ज्यांना कालवे सुद्धा माहित नाही अशी मंडळी आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असून आलेले पाणी हे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच असल्याचे प्रतिपादन थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले असून निळवंडे कॅनॉल वरील एसकेएफ वॉलचा शुभारंभ करण्यात आला.
जवळे कडलग येथील धामोडी नाला येथे एसकेएफ वॉलचा शुभारंभ करण्यात आला तसेच थोरात कारखान्याच्या पुढाकारातून आढळेश्वर मंदिर परिसरातील बंधारा व गावचे तळे पूर्ण क्षमतेने भरले या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, कारखान्याचे संचालक गुलाबराव देशमुख, मदन आंबरे, ॲड.बाबासाहेब गायकर, कैलास अण्णा देशमुख, राजेंद्र कडलग, बाबासाहेब देशमुख,ॲड.बाबासाहेब सुर्वे, सुनील देशमुख, नानासाहेब वामन, उत्तम सुर्वे, श्रीपत सुर्वे, प्रसाद कडलग,सौरभ कडलग,योगेश देशमुख,सुमित देशमुख,संजय सुर्वे,अशोक साबळे, दत्ता कडलक, अशोक लांडगे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यावर असलेल्या धामोडी नाला येथे एसकेएफ वॉलचा शुभारंभ करण्यात आला तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकारातून पाईपलाईन द्वारे गाव तळे आणि आडळेश्वर मंदिर परिसरातील तळे भरले असल्याने नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही ठिकाणच्या पाण्याचे जलपूजन ग्रामस्थांनी मोठ्या आनंदोत्सवात केले.

याप्रसंगी बोलताना पांडुरंग पाटील पुढे म्हणाले की, निळवंडे धरण सह डावा आणि उजवा कालवा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केला. दिवसाच्या कामाची सुरुवात हे धरणाच्या कामापासून करायचे. कोरोनाच्या काळात सर्व जग बंद होते मात्र अशा काळातही लोकनेते थोरात यांनी कालव्यांची कामे सुरू ठेवली. मोठ्या परिश्रमानंतर दोन्ही कालवे पूर्ण झाले आणि मागील दोन वर्षापासून या दोन्ही कालव्यांमधून पाणी येत आहे. या पाण्यामुळे हा परिसर समृद्ध होणार असून दुष्काळी भागाला पाणी मिळाले आहे. ज्यांना कालवे सुद्धा माहिती नाही अशी मंडळी पुढे येत आहे. त्यांना वेळीच ओळखा असे आवाहन त्यांनी केले.
तर रामहरी कातोरे म्हणाले की, तालुक्यातील जास्तीत जास्त भाग हा पाण्याखाली आला पाहिजे हा उद्देश ठेवून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी डाव्या व उजव्या कालव्यांची आखणी केली. कालव्याच्या वरच्या बाजूला पाणी मिळण्यासाठी त्यांनी विशेष योजना तयार केली होती. काही ठिकाणी उपसा जलसिंचन योजना मंजूर करून ठेवल्या मात्र नवीन सरकार आले आणि या योजना बंद केल्या. तालुक्यातील जनतेला पाणी मिळावे याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पाईपलाईन देऊन हे तळी भरून दिले आहेत.
तर गुलाबराव देशमुख म्हणाले की, ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार निळवंडे डाव्या कालव्याचे आउटलेट धामोडी फाटा येथे करण्यात आले. या ठिकाणी 300 ते 400 हेक्टर क्षेत्र असून पाण्याची कमतरता कायम भासते. यामुळे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केल्यानंतर हा एसकेएफ मंजूर करण्यात आला आहे.
फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि लोकनेते बाळासाहेब थोरात जिंदाबाद या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमला.
