आश्वी । झुंझार न्यूज

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर समाजाच्या सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात असून, काँग्रेस नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत म्हणाल्या की, पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षीय निष्पाप चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने आज आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे त्या चिमुकलीला मिळालेला खऱ्या अर्थाने न्याय आहे. अशा संवेदनशील प्रकरणात जलद गतीने न्याय मिळाल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


चिमुकल्यांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना डॉ. थोरात यांनी कठोर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “कोणत्याही निष्पाप लेकरावर अत्याचार करणाऱ्याला समाजात किंवा कायद्यात कोणतीही दया दाखवली जाऊ नये. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना समाजात स्थान असता कामा नये. त्यांना कठोरातील कठोर शिक्षाच झाली पाहिजे, हाच या निर्णयाने दिलेला ठाम संदेश आहे.


नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र हादरून गेला होता. जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत होता आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात होती. आज लागलेल्या निकालामुळे पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे.


या निकालामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी व्यक्त केली आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *