मुंबई । झुंझार न्यूज


राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन राज्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. अतिवृष्टी, नद्यांना आलेले पूर आणि मदतकार्याची तयारी यांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहून नागरिकांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हानिहाय परिस्थितीचा घेतला वेध


मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने मुंबई शहर, नाशिक, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांसह जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमधील पावसाच्या स्थितीची माहिती घेतली. विशेषतः कोकण आणि पुणे विभागात नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने तेथील पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महामार्ग आणि धरणांच्या पाणीपातळीवर लक्ष


या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली


१. वाहतूक व्यवस्था: अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे, मुंबई-गोवा आणि मुंबई-अहमदाबाद या प्रमुख महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले.
२. धरण साठा: कोयना धरणासह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीचा आढावा घेण्यात आला. धरणातून विसर्ग करताना खालच्या भागातील गावांना पूर्वसूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.
३. आषाढी वारी: सध्या सुरू असलेल्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पावसाचा त्रास होऊ नये आणि तिथे कोणतीही आपत्ती ओढवू नये, यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
४. पर्यटनस्थळे: पावसाळ्यात धबधबे आणि गड-किल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी वाढते. अशा ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

NDRF आणि SDRF सज्ज


मुंबईत येणाऱ्या समुद्राच्या भरतीचा धोका लक्षात घेता, किनारी भागातील नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आले आहे. तातडीच्या मदतीसाठी बोटी आणि इतर बचाव साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे.

नागरिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन


परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. “नागरिकांनी पावसाच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः डोंगरदऱ्यात किंवा धोकादायक पर्यटनस्थळी जाणे टाळावे. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे,” असे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासकीय यंत्रणा २४ तास कार्यरत असून नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगावी, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *