आषाढी पालखी सोहळ्यासाठी जलनियोजनाचे आणि पूरस्थिती हाताळण्याचे प्रशासनाला निर्देश
शिर्डी । झुंझार न्यूज
मागील दोन दिवसांपासून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य पूरस्थिती आणि आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जलव्यवस्थापनाचे सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि धरणांतून विसर्ग करताना जिल्हा प्रशासन, महसूल व पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री विखे पाटील यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या (Video Conferencing) माध्यमातून पुणे आणि नाशिक विभागातील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत दोन्ही महामंडळांचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. राज्यातील अतिवृष्टी, प्रमुख नदीखोऱ्यांतील पाण्याची आवक आणि आषाढी वारीसाठी करण्यात आलेले नियोजन यांचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

पाणीसाठ्यात विक्रमी वाढ: पुणे विभागात ८० टीएमसीची भर
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ १२ टक्के होता, तो ७ जुलैपर्यंत ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या ५ दिवसांत सुमारे ८०.८ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने खडकवासला धरण समूहात ७.५४ टीएमसी, पवना धरणात ४.८४ टीएमसी, भामा आसखेडमध्ये ४.१५ टीएमसी, भाटघरमध्ये ५.१६ टीएमसी, वीरमध्ये २.०१ टीएमसी आणि नीरा देवघर धरणामध्ये २.६२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती
नाशिक विभागातील पाणीसाठा २६ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामध्ये भंडारदरा (४.७५ टीएमसी), निळवंडे (१.७१ टीएमसी), दारणा (१.५५ टीएमसी) आणि गंगापूर (२.१२ टीएमसी) या धरणांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा आता २१.७६ टीएमसी झाला असून विभागाचा एकूण साठा ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पूर नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापन
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी भारतीय हवामान विभाग (IMD) आणि केंद्रीय जल आयोगाच्या अंदाजांचा सातत्याने आढावा घ्यावा, अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या. “धरण संचलन करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करा. विसर्ग करण्यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना पूर्वसूचना द्या आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी सतत संपर्कात राहा,” असे विखे पाटील यांनी सांगितले.

आषाढी वारीसाठी विशेष नियोजन
आगामी आषाढी पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावरील नदीपात्र, कालवे आणि मुक्काम स्थळांवर वारकऱ्यांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहील, याची जबाबदारी जलसंपदा विभागाने घ्यावी. स्थानिक नागरिक आणि वारी सोहळा प्रमुखांशी समन्वय ठेवून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सोशल मीडियाचा वापर आणि तांत्रिक सुरक्षा
नदीकाठच्या नागरिकांना अफवांपासून वाचवण्यासाठी आणि अधिकृत माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. तसेच मान्सून काळात धरणांची तांत्रिक तपासणी, दरवाजे आणि विद्युत प्रणालीची नियमित देखभाल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी यावेळी दिले.
