अहिल्यानगर जिल्हयातील सोयी-सुविधांबाबत वारकऱ्यांकडून समाधान

विखे पाटील यांच्या पुढाकाराने ‘वारकरी चरण सेवा’ उपक्रम

 

लोणी । झुंझार न्यूज 

 


त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्‍ठ श्री. निवृत्‍तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी ‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी बुद्रुकमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सुमारे ६५ दिंड्यांमधील ५० हजार वारकऱ्यांनी लोणीत मुक्काम केला असून, ग्रामस्थांच्या वतीने चोख नियोजन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

 


सोमवारी या पालखी सोहळ्याचे गोगलगाव येथे आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. मंगळवारी पालखी लोणीत दाखल झाल्यानंतर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन व स्वागत करण्यात आले. यावेळी ह.भ.प. भारत महाराज धावणे, किसनराव विखे, अनिल विखे, लक्ष्मण बनसोडे, किशोर धावणे, भाऊसाहेब धावणे, विकास म्हस्के यांसह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोणी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यातील प्रमुख मानकरी आणि पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये जयवंत महाराज गोसावी, मोहन महाराज बेलापूरकर, ह.भ.प. माधवदास महाराज राठी, उपाध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, बाळकृष्ण महाराज टापरे, सचिव श्रीपाद महाराज कुलकर्णी, नवनाथ महाराज गांगुर्डे, चैतन्य महाराज नागरे आदींचा समावेश होता.

विखे पाटील यांच्याकडून सोयी-सुविधांची अंमलबजावणी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत. यंदाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांसाठी उत्तम रस्ते, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः सोमवारी झालेल्या पावसामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी तातडीने यंत्रणा हलवून उपाययोजना केल्या, बद्दल वारकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

वारकरी चरण सेवा’ ठरतेय आधार


यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेला ‘वारकरी चरण सेवा’ उपक्रम. लांबच्या पल्ल्यामुळे थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. यासोबतच फिरती आरोग्य पथकेही दिंडीसोबत तैनात आहेत. पालखी प्रमुख माधवदास महाराज राठी यांनी या सर्व सुविधांबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे आणि शासनाच्या मदतीमुळे वारकऱ्यांचा प्रवास सुसह्य झाला आहे.

सध्या लोणी परिसरात भक्तीचे वातावरण असून, स्थानिक प्रशासनाने आणि विखे पाटील परिवाराने वारकऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था केल्याने वारकरी संप्रदायातून आनंद व्यक्त होत आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *