आश्वी । झुंझार न्यूज

गुहा ते शिबलापूर या २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता प्रवाशांसाठी ‘अडचण नसून मोठा खोळंबा’ ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, संतापलेल्या ग्रामस्थांनी आता प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची डागडुजी न झाल्याने संपूर्ण २२ किमी अंतरात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, नक्की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, हे ओळखणेही प्रवाशांना कठीण झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी “खड्डे वाचवा आणि बक्षीस मिळवा” अशी उपरोधिक शक्कल लढवत शासनाचा निषेध केला आहे.

या रस्त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा अर्धा भाग संगमनेर तालुक्यात येतो, तर उर्वरित अर्धा भाग राहुरी तालुक्यात येतो. दोन तालुक्यांच्या सीमेवर हा रस्ता अडकल्याने दोन्ही बाजूंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सीमावादामुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे सामान्य जनतेला मात्र नरकयातना सोसाव्या लागत आहेत.

या रस्त्याच्या प्रश्नावर भागातील किशोर जोशी, नितीन पाबळे, संपत बोऱ्हाडे, सुनील जोशी, संतोष पर्वत, संजय जोशी, दत्तात्रय पर्वत, अशोकराव जोशी, उपसरपंच राजेश्वरी जोशी, संदीप नाईकवाडी, प्रकाश जोशी  आदींसह परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून साधी पायवाट चालणेही कठीण झाले आहे. जर येत्या काही दिवसांत या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर संपूर्ण जनता रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *