{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

प्रति आवर्तन २४ हेक्टरला मिळणार १ कोटी लिटर पाणी!

आश्वी । झुंझार न्यूज

निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता विशेष नियोजन करण्यात आले आहे. पाणी वाटपातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘पाणी वाटप संस्था’ स्थापन केली जाणार असून, या माध्यमातून प्रति आवर्तन २४ हेक्टर क्षेत्राला तब्बल एक कोटी लिटर पाणी पाईपद्वारे दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. १०) शिर्डी विधानसभा मतदारसंघ स्तरीय आढावा व समन्वय बैठक तसेच मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “निळवंडेचे पाणी अद्याप अनेक भागांत पोहोचलेले नाही. हे पाणी न्याय्य पद्धतीने मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्याचे क्षेत्र सर्वात मोठे आहे, त्याच्या अध्यक्षतेखाली ‘पाणी वाटप संस्था’ स्थापन होईल. यामध्ये ८-८ हेक्टरचे तीन गट करून प्रत्येक गटाला ३० लाख लिटर पाणी दिले जाईल. अशा प्रकारे एकूण २४ हेक्टरला एका आवर्तनात एक कोटी लिटर पाणी मिळेल. पाईपलाईनचे जाळे निर्माण करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी नेण्याचे आमचे लक्ष्य आहे.

पाणी नियोजनातील आणखी एक महत्त्वाचा बदल सांगताना डॉ. विखे म्हणाले की, “ऑटोमेशनची जुनी योजना रद्द केल्यामुळे शासनाचे ६० कोटी रुपये वाचले आहेत. हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वळवण्यात आला असून, शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरासाठी (कागद) शेतकऱ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे आवर्तन संपल्यानंतरही शेतकऱ्यांना पुढील दोन महिने शेतीला पाणी देणे शक्य होईल. तसेच ओव्हरफ्लोचे पाणी गावागावातील शेततळ्यांत सोडण्याचे नियोजन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.


डॉ विखे पाटील पुढे म्हणाले की, निमगावजाळी येथे ‘बिबट सफारी’ प्रकल्पासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असून, केंद्र सरकारच्या परवानगीनंतर त्याचे काम गतीने सुरू होईल. तसेच निझर्णेश्‍वर मंदिर परिसरात प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे कालवे आणि पोटचाऱ्यांच्या कामांना गती मिळून पाण्याची गळती थांबण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील यांनी पक्ष बांधणीवर भर दिला. “विखे पाटील परिवाराचे अस्तित्व भाजपमुळे आहे, त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत एकही पात्र मतदार सुटणार नाही आणि अपात्र व्यक्तीची नोंद होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी बीएलओ आणि कार्यकर्त्यांना दिल्या.


या बैठकीला ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, कैलास तांबे, मच्छिंद्र थेटे, आर. डी. कदम, भगवान इलग,  तबाजी मुन्तोडे, गुलाबराव सांगळे , विजय म्हसे अजय ब्राम्हणे, गोकुळ दिघे, सचिन शिदे , दिलिप मुन्तोडे, सतिश जोशी, शिवाजी इलग, भारत गिते, अशोक जऱ्हाड , रमेश गीते , अनिल म्हसे यांच्यासह २८ गावांतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *