{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

राहाता । झुंझार न्यूज

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. “आम्ही किंवा आमचे कार्यकर्ते गणेश कारखान्याची निवडणूक लढवणार नाही,” अशी मोठी घोषणा त्यांनी केली. मात्र, कारखान्याबाबत सुरू असलेला न्यायालयीन लढा हा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, तो प्रवरा कारखान्याच्या सभासदांच्या हक्काच्या पैशांच्या संरक्षणासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

राहाता येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी राहाता शहर आणि गणेश कारखाना परिसरातील पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक न लढवण्याचा निर्णय

डॉ. विखे पाटील म्हणाले की, “गणेश कारखाना तुमचाच आहे आणि तो सभासदांनीच चालवावा, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत उतरणार नाही. मात्र, कारखान्याशी संबंधित जो न्यायालयीन वाद सुरू आहे, तो कोणत्याही संस्थेला अडवण्यासाठी किंवा कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही. प्रवरा कारखान्याच्या सभासदांनी कष्टातून उभे केलेले पैसे सुरक्षित राहावेत, हीच आमची धारणा आहे. ते पैसे सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे यांचे नसून, ते सभासदांच्या हक्काचे आहेत. त्या पैशांचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.”

ऊस पळवापळवीच्या आरोपांना प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऊस प्रश्नावर बोलताना त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. “ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, हा सर्वस्वी शेतकऱ्यांचा अधिकार आहे. जेव्हा गणेश कारखाना आम्ही चालवत होतो, तेव्हा इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस नेला होता. मग आता आमचे कार्यकर्ते त्यांच्या इच्छेनुसार ऊस देत असतील, तर त्याला विरोध का केला जातोय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विकासाच्या मुद्द्यावर भर; विरोधकांना दिला सल्ला

राजकीय वादावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, “आमचा कोणाशीही वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांनी विकासकामे करावीत. विरोधकांनी केवळ भाषणांवर वेळ न घालवता विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी.” यावेळी त्यांनी राहाता शहराच्या विकासाचा शब्द दिला. “पुढील दोन वर्षांत राहाता शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. आमचा पूर्ण भर केवळ आणि केवळ विकासकामांवरच असणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना संयमाचा मंत्र

भाजपच्या संघटन शक्तीवर भाष्य करताना डॉ. विखे म्हणाले की, जोपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, तोपर्यंत विखे पाटील यांच्या नेतृत्वाला कोणताही धक्का लागू शकणार नाही. कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नये. शांत राहून लोकांच्या विश्वासावर राजकारण करा आणि प्रगतीची कामे सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या भूमिकेमुळे गणेश कारखाना परिसरातील राजकीय वातावरण आता पूर्णपणे बदलले असून, त्यांच्या या निर्णयाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *