शिष्यवृत्तीतून एका वर्षात २ कोटी २० लाखांचा लाभ


यशोधन मधून नोंदणी झाल्यामुळेच असंघटित कामगारांना साहित्य – जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे

 



संगमनेर । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयामार्फत मागील चार वर्षांपासून असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. यशोधन मधून १८ हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली असून मागील एका वर्षात शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २ कोटी २० लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला असल्याची माहिती असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी दिली. याचबरोबर यशोधन मधून असंघटित कामगारांची नोंदणी झाल्यामुळेच तालुक्यातील या कामगारांना भांडे व घरगुती साहित्य मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

असंघटित कामगारांच्या विविध योजनांबाबत माहिती देताना असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता मागील पाच वर्षापासून स्वतंत्र सेवा कक्ष सुरू करण्यात आला. या अंतर्गत जनसेवकांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन पात्र व योग्य लाभार्थ्यांची कागदपत्रे संकलित करून ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. या माध्यमातून हजारो कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र कामगारांपर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने सुरू केले. तसेच अपघातात जखमी अथवा मृत झालेल्या 11 कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. याशिवाय नोंदणीकृत कामगारांना विविध गृहउपयोगी साहित्य व इतर योजनांचाही लाभ मिळत असल्याचे आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक असंघटित व घरेलू कामगारांनी यशोधन कार्यालया मार्फतच नोंदणी केली असून त्यांना घरगुती साहित्य भांडे व योजनांचा लाभ मिळत आहे.

मात्र तालुक्यात नवीन लोकप्रतिनिधी व काही व्यक्तींकडून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या कामगारांना लाभ मिळत आहे त्यांना जर विचारले आपण नोंदणी कुठे केली आहे किंवा तुम्हाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न केला आहे त्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच नाव घेतील. ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया किंवा योजनांच्या अंमलबजावणीत कोणतेही योगदान दिले नाही ते आता मेळावे घेऊन भांडे वाटप करत श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. वस्तुस्थितीमध्ये यांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही.

कामगार कल्याण आयुक्तालयाने ज्या कार्यालयांमार्फत किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणीची सेवा उपलब्ध करून दिली त्यांच्यामार्फतच साहित्याचे वितरण व्हावे, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी यापूर्वी केली होती. मात्र, संगमनेर तालुक्यामध्ये सत्तेचा दुरुपयोग करून श्रेय घेण्यासाठी भांडे वाटप करून त्याच्यावर त्यांचे फोटो चिटकवले जात आहे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली आहे.

यशोधन कार्यालयातून कामगारांना मोफत नोंदणी व ऑनलाइन सेवा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयामार्फत तालुक्यातील असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी पूर्णपणे मोफत नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. अनेक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करण्यात आली. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कामगार व महिलेला तत्परतेने सेवा देण्यात आली. या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला असून ज्यांनी काम केले नाही ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. यशोधन कार्यालयातून ही योजना राबविण्यात आल्याने खाजगी एजंटांची एजंटगिरी बंद झाली आहे. कोणी एक रुपया जरी मागितला तरी कामगारांनी तातडीने यशोधन कार्यालय किंवा शासनाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *