अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल मैदानावर दि. ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी, शासकीय व खासगी आरोग्य संस्थांनी तसेच सेवाभावी संघटनांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. आष्टी हा अहिल्यानगर जिल्ह्यालगतचा तालुका असल्याने जिल्ह्यातील अनेक रुग्ण या शिबिराचा लाभ घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंदणी, तपासणी, निदान, उपचार तसेच आवश्यक संदर्भ सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली बांगर, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. अजित विसपुते, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहान शाह, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. स्वप्नील तुपे, गणेश शिंदे, प्रवीण पोखडे तसेच विविध आरोग्य विभागांचे अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिर हे गरजू नागरिकांना तज्ज्ञ आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. शिबिरासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सुलभ, जलद आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. शेजारील जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होत असले तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेणार असल्याने कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने आणि समन्वयाने कार्य करावे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी शिबिराच्या नियोजनाची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संलग्न सर्व रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ रुग्णालये, एसटीईएमआय व एचएचएल यंत्रणा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, अन्न व औषध प्रशासन तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या महाआरोग्य शिबिराचे संयोजक आमदार सुरेश धस आहेत.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराचे नियोजन तीन टप्प्यांत करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विविध आजारांचे निदान झालेल्या रुग्णांची यादी तयार करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात नवीन रुग्णांची तपासणी करून त्यांचे निदान केले जाणार आहे. तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात दि. ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजी आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल मैदानावर मुख्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या महाआरोग्य शिबिरात नोंदणी विभाग, प्राथमिक तपासणी विभाग, नाक-कान-घसा विभाग, श्वसनरोग विभाग, नेत्रविकार विभाग, होमिओपॅथी विभाग, आयुर्वेद विभाग, फिजिओथेरपी विभाग, औषधोपचार विभाग, हिरकणी कक्ष, रक्त संकलन विभाग, मेंदू विकार विभाग, कृत्रिम अवयव विभाग, त्वचारोग विभाग, अस्थिरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, हृदयरोग विभाग, बालरोग विभाग, सामान्य शस्त्रक्रिया विभाग, दंतरोग विभाग, कर्करोग विभाग, मानसिक रोग विभाग, मूत्रविकार विभाग, मूत्रपिंड विकार विभाग, महिलांसाठी स्वतंत्र प्राथमिक तपासणी विभाग, चौकशी कक्ष आणि रुग्ण संदर्भ कक्ष असे विविध विशेष विभाग उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांवरील तज्ज्ञ तपासणी, निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबतही बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरातून उपचारासाठी संदर्भित करण्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्राधान्याने, दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी रुग्णालयांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *