झरेकाठी । झुझार न्यूज

 

सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सुरू केलेला हरिनाम सप्ताह आता जगाच्या पाठीवर आध्यात्मिक क्षेत्रातील लोकचळवळ झाला आहे. या परंपरेला आणि सनातन हिंदू संस्कृतीला पुढे घेऊन जाण्यासाठी युवकांचा सहभागसुद्धा तितकाच समाधान देणारा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

धनगरवाडी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात १८ ऑगस्टपासून होत आहे. या निमित्ताने सप्ताह स्थळावर मंगलमय वातावरणात महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महंत हरीशरण महाराज, महंत मधुसूदन महाराज, ह.भ.प. नवनाथ महाराज, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष सत्यजीत कदम, श्रीनिवास बियाणी, संजय फंड, नानासाहेब शिंदे, सरपंच गोपीनाथ खरात, गंगाधर चौधरी, भाजपाचे अध्यक्ष बाबासाहेब चिडे, सौ. शोभाताई घोरपडे उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे-पाटील म्हणाले की, सप्ताहाची १७९ वर्षांची परंपरा अखंडपणे सुरू आहे, ते फक्त या सप्ताहाला लोकांचे असलेले पाठबळ असल्यामुळेच. हा सप्ताह आता द्विशताब्दीकडे वाटचाल करीत असून, वेगवेगळ्या माध्यमातून सप्ताहाच्या पाठीशी समाज उभा राहतो, हे आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे उदाहरण जगाच्या पाठीवर आहे.

सप्ताहामध्ये लाखो भाविक एकत्रित येऊन वारकरी संप्रदायाचा वारसा आणि सनातन संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. यामध्ये आता तरुण पिढीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये युवा शक्तीचे योगदान हे समाधान देणारे असल्याचे मंत्री विखे-पाटील म्हणाले. महंत रामगिरीजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आक्रमकपणे पुढे येऊन कार्य करीत आहेत, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. एकीकडे हिंदू धर्म आणि संस्कृती परंपरांना बदनाम करण्याचे प्रयत्न होतात, अशा कटकारस्थानांना गावागावात होणारे हरिनाम सप्ताह हेच उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले.

“धनगरवाडीमध्ये होत असलेल्या या सप्ताहाच्या निमित्ताने ४ कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांची कामे मार्गी लागली असून, समाधानकारक पाऊस झाल्यामुळे परिसरातील धनगरवाडी व चितळी परिसरातील सहा तळ्यांसह सात तलाव, के.टी. वेअर आणि पाझरतलाव भरले आहेत. निळवंड्याच्या डाव्या कालव्याची वहनक्षमता चांगली होण्यासाठी पीडीएनचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात दिली.”

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *