युवा व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मागणीची दखल; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन
संगमनेर । झुंझार न्यूज
कृषी विभागाच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेत १८ ते २० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन शासन स्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
सध्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, अल्पभूधारक व युवा शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेत आणि कमी खर्चात करण्यासाठी लहान क्षमतेच्या ट्रॅक्टरची मोठी गरज आहे. मात्र, महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या आकारमानानुसार योग्य क्षमतेचा ट्रॅक्टर घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विशेषतः युवा शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असून, मशागत, पेरणी, फवारणी, आंतरमशागत तसेच विविध कृषी कामांसाठी लहान क्षमतेचे ट्रॅक्टर उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे १८ ते २० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अल्पभूधारक, लघु व युवा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, अशी भूमिका आमदार खताळ यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करून महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आवश्यक ते बदल करावेत. तसेच १८ ते २० एचपी ट्रॅक्टरसाठी अनुदानाची सुविधा लागू करून पात्र युवा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी तातडीने शासन निर्णय व आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.