साकूर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील कौठेमलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) प्रस्तावित असलेल्या जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध करण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उग्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलकांनी सौर प्रकल्पाचे साहित्य तातडीने हटविण्याची मागणी केली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी गुलाबराजे भोसले यांच्यासह १० ते १२ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.


साकूर पठार भागातील हजारो बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळावा, यासाठी कौठेमलकापूर येथील शेकडो हेक्टर जागेवर एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून हा प्रकल्प आकारास येत आहे. मात्र, याच नियोजित जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


बुधवारी झालेल्या या आंदोलनात ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, सरपंच रविंद्र दातीर, रणजित ढेरंगे, सोमनाथ बारवे यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. “एमआयडीसी होऊ नये, यासाठीच हा सौर प्रकल्प आणला आहे का?” असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना गुलाबराजे भोसले यांनी दोन दिवसांत सौर प्रकल्पाचे साहित्य न हटवल्यास जाळपोळ करण्याचा आणि अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.


घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी नायब तहसीलदार गणेश आढारी यांना निवेदन दिले. “सौर प्रकल्पाचे काम सध्या स्थगित करण्यात आले आहे,” अशी माहिती आढारी यांनी दिली. मात्र, केवळ स्थगिती नको, तर साहित्यही हटवावे या मागणीवर आंदोलक ठाम राहिले.


यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा थेट सौर प्रकल्पाच्या मशिनरीकडे वळवला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत गुलाबराजे भोसले, रणजित ढेरंगे, सरपंच रविंद्र दातीर, सोमनाथ बारवे यांच्यासह प्रमुख १०-१२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *