हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या ४७व्या पुण्यतिथीनिमित्त पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रगतशील शेतकरी संतोष सुधाकर पन्हाळे यांना प्रतिष्ठेचा कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रात सलग पाच वर्षे तेल्या रोगापासून मुक्त दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेऊन पन्हाळे यांनी डाळिंब शेतीत उल्लेखनीय यश मिळविले. त्यांच्या डाळिंबाला महाराष्ट्रातील सर्वाधिक दर मिळाल्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार निलय नाईक, आमदार किसनराव वानखडे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, नगराध्यक्ष अनिता नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष विज्वल तसेच प्रतिष्ठानचे मार्गदर्शक गोविंद फुलके आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या पाचही विभागांतील नऊ प्रगतशील शेतकरी तसेच दोन कृषी शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातून संतोष सुधाकर पन्हाळे यांची कृषी गौरव पुरस्कारासाठी निवड झाली.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी सौ. स्मिता पन्हाळे, हरिभाऊ पन्हाळे, कु. यज्ञा पन्हाळे, सिद्धी पन्हाळे, यश पन्हाळे यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
संतोष पन्हाळे यांच्या डाळिंब शेतीतील उल्लेखनीय कामगिरीची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सात्रळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या यशामुळे सात्रळचे नाव कृषी क्षेत्रात महाराष्ट्रासह देशभर पोहोचले आहे.