संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. महेश महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. आपल्या ओघवत्या आणि विनोदी शैलीतून त्यांनी उपस्थितांना परमार्थाची गोडी लावत समाजप्रबोधन केले.

मंदिरावरून ठरते गावाची श्रीमंती
कीर्तनाचे निरूपण करताना महेश महाराज शास्त्री म्हणाले की, “गावाची श्रीमंती ही गावातील टोलेजंग बंगले किंवा चकाचक रस्ते पाहून ठरत नाही, तर त्या गावातील मंदिर पाहून कळते. पानोडी येथील अतिशय सुंदर असलेले हनुमान मंदिर हे या गावाचे ‘नाक’ असून गावाची अस्मिता आहे. परमार्थ हा श्रीमंतीचा असावा लागतो. आज अनेक ठिकाणी सप्ताहाची परंपरा खंडित होत असताना पानोडीकरांनी मात्र ही वारकरी परंपरा जोपासली आहे. हा वारकरी संप्रदाय केवळ टाळकऱ्यांमुळेच टिकून आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रपंच आणि परमार्थातील फरक
माणसाच्या जगण्यावर भाष्य करताना महाराज म्हणाले की, “प्रपंचाचा शेवट हा नेहमी पश्चातापात होतो, मात्र परमार्थाचा शेवट हा गोड प्रसादात होतो. जो केवळ स्वतःचा विचार करतो तो सामान्य मनुष्य, पण जो दुसऱ्याचा विचार करतो तोच खरा परमार्थाचा वाटेकरी असतो.” संतांचे महत्त्व सांगताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली की, “माणसाला स्वतःच्या बायकोचा स्वभाव कळायला दहा वर्षे लागतात, तिथे संतांचे मर्म जाणून घेणे साधी गोष्ट नाही. संत समाजात वावरले, पण लोकांना ते कळाले नाहीत.”

विनोदी शैलीतून समाजप्रबोधन
महेश महाराज शास्त्री यांनी आपल्या दीड तासाच्या कीर्तनात प्रश्नावली आणि विनोदी दाखले देत भाविकांना हसवून सोडले. महिलांच्या विविध विषयांवर भाष्य करताना त्यांनी साडी, शेतीची कामे आणि सध्या चर्चेत असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचाही विनोदी अंगाने उल्लेख केला. “ज्या घरात आईचा मान आहे, गोठ्यात गाय आहे आणि शेतात एकनिष्ठ भाऊ आहे, तो पती खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो,” असे त्यांनी कौटुंबिक समृद्धीचे सूत्र सांगितले.

तुकोबांच्या अभंगातून सद्गुणांचे महत्त्व
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेत त्यांनी चंदन आणि परिसाचे महत्त्व विषद केले. मनुष्य जीवनात सद्गुणांचे महत्त्व काय असते आणि संतांची संगत कशी असावी, हे त्यांनी भाविकांना पटवून दिले. “साधू-संत ही पदवी नसून ते सज्जनतेचे प्रतीक आहेत. पृथ्वीचा भार हा केवळ सात गुणांमुळे टिकून आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नानासाहेब शिंदे, बर्डे, गोलवड, पिंपळे, हाळनोर, आयनोर, कळंबे, गुळवे, माळी, सूळ आणि ठाकरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. भाविकांनी बुंदी, भात आणि आमटीच्या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

या सोहळ्याला पानोडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यात्म आणि विनोदाची सांगड घालत पार पडलेल्या या कीर्तनाने सप्ताहाच्या पाचव्या दिवशी मोठी रंगत आणली.

