पवित्र रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राहाता नगरपरिषदेत आज एका भावूक आणि उत्साहपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरपरिषदेला सदिच्छा भेट दिली असता, राहाता शहरातील माता-भगिनी, महिला नगरसेविका आणि पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना राखी बांधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
‘सुजय विखे हा कुटुंबाचाच भाग’
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील भावूक झाले होते. ते म्हणाले की, “नगराध्यक्षांच्या आग्रहाखातर मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मात्र, येथे आल्यावर ज्या प्रकारे महिला कर्मचाऱ्यांनी आणि भगिनींनी धावत येऊन मला राखी बांधली, त्यावरून हे सिद्ध होते की सुजय विखे हा त्यांच्यासाठी केवळ एक नेता नसून त्यांच्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग आहे. महिलांच्या मनात निर्माण झालेली ही विश्वासाची भावना माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.
सर्वसामान्यांचा भाऊ हीच खरी उपलब्धी
डॉ. विखे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, “नगरसेवक असो वा नगरसेविका, ते तर आपले आहेतच; पण नगरपरिषदेत झाडू मारणारा स्वच्छता कर्मचारी असो किंवा झोपडपट्टीत राहणारा सामान्य नागरिक, या प्रत्येकाला माझ्यामध्ये आपला हक्काचा ‘भाऊ’ दिसतो, हीच माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘बुलडोझर कायदा’ सुरूच राहणार या कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक आणि ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “महिलांच्या सुरक्षिततेसाठी मी या मतदारसंघात नेहमीच कठोर पावले उचलली आहेत. गुन्हेगारांवर कारवाई करताना किंवा अनधिकृत बांधकामे पाडताना काहींनी त्याला ‘मनमानी’ म्हटले किंवा विरोध केला. परंतु, मी आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल किंवा कायद्याचे उल्लंघन होईल, तिथे माझा ‘बुलडोझर कायदा’च चालेल. महिलांच्या सन्मानासाठी हा कठोर बाणा असाच सुरू राहील.
या सोहळ्याला राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, विविध प्रभागांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि नगरपालिकेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता, भाऊ-बहिणीच्या नात्यातील दृढ विश्वास अधोरेखित करणारा ठरला.