कोपरगाव । झुंझार न्यूज

भौतिक सुखात मनुष्याला अध्यात्माचा काहीसा विसर पडत आहे, प्रत्येकाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या संकटावर मात करण्याची प्रेरणा व अध्यात्म ज्ञानाची शिकवण, तसेच १८ विविध योगाबद्दलचे ज्ञान एकमेव ज्ञानेश्वरी ग्रंथातून मिळते तेव्हा प्रत्येकाने ज्ञानेश्वरी पारायण करावे असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांनी केले.

         

तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समूह व संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचा शुभारंभ करताना परमपूज्य रमेश गिरी महाराज बोलत होते. पारायणाचे एकतीसावे वर्ष आहे.

       

प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे प्रास्ताविक करताना म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेकभैय्या कोल्हे अध्यात्म भक्ती मार्गातील प्रत्येक उपक्रम राबवण्यात सदैव कार्यतत्पर आहेत.

         

परमपूज्य रमेशगिरी महाराज पुढे बोलताना म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील प्रवरा नदीतिरी संत ज्ञानेश्वरांनी ७३६ वर्षांपूर्वी सन १२९० मध्ये भगवतगीतेवरील भाष्य भावार्थदीपिका म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन केले. यात १८ अध्याय ७०० श्लोक आणि ९११२ ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांचे गुरु त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ महाराज होते. मराठीचे आद्य संपादक संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध करून लिहिला, संत महिपती यांनी ज्ञानेश्वरीचे संकलन केले, तर संत नामदेव यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रसार केला. कोपरगाव तालुका संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून ज्ञानेश्वरीचे पारायण करायला मिळणे हे आपले भाग्य आहे. भ्रमणध्वनीचा अतिरेक युवकांनी टाळावा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पुरेपूर वाचन करावे. ज्ञानेश्वरी ग्रंथात अर्जुनविषाद, सांख्य, कर्म, ज्ञानसंन्यास, योगगर्भ आत्म संयम, विज्ञान, ब्रह्माक्षरनिर्देश, राज विद्या राजगुह्या, विभूती, विश्वरूपदर्शन, भक्ती, प्रकृतीपुरुष विवेक, गुणातीत, पुरुषोत्तम, दैवसूरसंपाद्वीभाग, श्रद्धादीनिरूपण, सर्वगीतार्थ संग्रह या १८ योगांचे प्रत्येक अध्यायामध्ये विवेचन केलेले आहे. यावेळी रमेश गिरी महाराजांनी चातुर्मासाची माहिती देऊन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

         

याप्रसंगी माजी संचालक संदीप चव्हाण, व्यासपीठ चालक ह भ प जालिंदर महाराज शिंदे अंचलगावकर, उपमुख्यलेखापाल प्रवीण टेमगर, भीमा संवत्सरकर, अशोकराव लोहकणे, संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कामगार विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला भगिनी, मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन वसंत थोरात यांनी केले तर उपमुख्यलेखापाल प्रवीण टेमगर यांनी आभार मानले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *