{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

विद्यार्थ्यांनी रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे : डॉ. सुस्मिता विखे पाटील

लोणी । झुंझार न्यूज

बदलत्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण देणे पुरेसे नाही. त्यांच्यामध्ये उद्योजकतेची जाणीव, व्यावहारिक ज्ञान, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण होणे आवश्यक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थी नोकरी शोधणारा नव्हे, तर भविष्यात इतरांना रोजगार देणारा उद्योजक व्हावा, या उद्देशाने ‘बिल्डिंग प्रवरा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी दिली.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ‘बिल्डिंग प्रवरा’ अंतर्गत बिझनेस एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. या एक्स्पोचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हा एक्स्पो सर्वांसाठी खुला राहणार आहे.

या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी ‘बिल्डिंग प्रवरा’ची संकल्पना, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या प्रत्यक्ष फायद्यांची माहिती दिली.

त्या म्हणाल्या, “आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षण देणे पुरेसे नाही. शिक्षणाबरोबरच सामाजिक भान, व्यावहारिक अनुभव, आर्थिक व्यवहारांची समज आणि स्वतः काहीतरी निर्माण करण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.”

७७५ विद्यार्थ्यांचा सहभाग

बिझनेस एक्स्पोमध्ये तब्बल ७७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून १७२ स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थी विविध उत्पादने, नाविन्यपूर्ण कल्पना आणि व्यवसाय संकल्पना प्रत्यक्ष मांडणार आहेत.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील ज्ञानावर अवलंबून न राहता व्यवसायाच्या प्रत्यक्ष जगाचा अनुभव घेता येणार आहे. व्यवसायाची संकल्पना निश्चित करणे, नियोजन करणे, उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, बाजारपेठेचा अभ्यास करणे तसेच आर्थिक व्यवहार समजून घेणे, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

उद्योजकतेला व्यासपीठ

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि नव्या संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा ‘बिल्डिंग प्रवरा’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या मनात उद्योजकतेची बीजे रुजवून भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची तसेच इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याची मानसिकता विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग, व्यवसाय, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव या क्षेत्रांतही विविध उपक्रम राबवत असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

अहिल्यानगरचा विद्यार्थी रोजगार शोधणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा व्हावा, यासाठी त्याला योग्य संधी, मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. ‘बिल्डिंग प्रवरा’ हा त्याच दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे,” असे डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *