काँग्रेसचे श्रीरामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कारभाराच्या चौकशीचीही मागणी

श्रीरामपूर । झुंझार न्यूज

 

मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण उत्तरच्या वतीने करण्यात आली. याबाबत श्रीरामपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्ताचा दाखला देत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त यांच्यात अनेक निर्णयांबाबत मतभेद झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यांच्या मतांच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांनी अनेकदा निर्णय घेतल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकनाच्या प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत, पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळणे हा लोकशाही प्रक्रियेवरील गंभीर आघात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मतदार याद्यांबाबत पारदर्शकता, निष्पक्षता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या ‘वोट चोरी’च्या मुद्द्याचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांची कायदेशीर तपासणी करण्यात यावी, तसेच आयोगाच्या निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती किंवा घटकांचीही चौकशी करून दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. प्रभावती घोगरे, संगमनेर तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कार्याध्यक्ष अमोल शेलकर, अभिजित लुनिया यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *