आठवले गटासह दलित चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर निष्ठा ठेवून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन चळवळ महाराष्ट्रासह देशभरात सातत्याने विस्तारत आहे. तळागाळातील, वाडी-वस्तीवरील आणि ग्रामीण भागातील सामान्य माणूस थेट आठवले यांच्या नेतृत्वाशी जोडला गेला. ७०-८० च्या दशकात धगधगणाऱ्या ‘दलित पॅंथर्स’च्या काळात अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली. या ऐतिहासिक संघर्षात अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्हा हा रिपब्लिकन चळवळीचा आणि पॅंथर्सचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आला. या भूमीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे संपूर्ण जिल्ह्यात रामदास आठवले यांचे सामाजिक व राजकीय वलय कायम राहिले.

मात्र, २०२६ हे वर्ष अहिल्यानगर जिल्ह्यातील रिपब्लिकन चळवळीसाठी अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी ठरले आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या अल्पावधीत — जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात — रिपब्लिकन पक्षाचे आणि रामदास आठवले यांचे अत्यंत विश्वासू असलेले तीन खंदे ‘शिल्लेदार’ एकामागून एक काळाच्या पडद्याआड गेले. यामुळे नामदार रामदास आठवले यांच्या वैयक्तिक नेतृत्वाला आणि जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी चळवळीला जबर धक्का बसला असून कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
तीन महिन्यांत ढासळले चळवळीचे तीन भक्कम तट
१. स्व. अशोकराव गायकवाड
२. स्व. राजाभाऊ कापसे
३. स्व. अजय साळवे
हे तिन्ही नेते अहिल्यानगरमधील रिपब्लिकन चळवळीचे मुख्य आधारस्तंभ होते. संघर्षाच्या काळात पक्षाशी आणि रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठ राहत त्यांनी जिल्ह्यात संघटनात्मक ताकद मजबूत केली. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घराघरांत पोहोचवण्यात या तिन्ही नेत्यांचे योगदान अतुलनीय होते. या तिघांच्या अचानक जाण्याने संपूर्ण रिपब्लिकन चळवळ शोकाकुल झाली आहे.
नामदार रामदास आठवले २ ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर
जुलै आणि ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबर महिन्यात अजय साळवे यांच्या अनपेक्षित निधनाने कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आगामी शुक्रवारी, २ ऑक्टोबर २०२६ रोजी स्व. अजय साळवे यांचा जलदान विधी पार पडणार आहे.
आपल्या अत्यंत विश्वासू व निष्ठावंत सहकाऱ्याला अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले स्वतः अहिल्यानगर येथील ऐतिहासिक ‘नील क्रांती चौक’ येथे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते स्व. अजय साळवे यांच्या स्मृतीस अभिवादन करून सांत्वनपर भावना व्यक्त करतील. आपल्या खंद्या साथीदारांना गमावल्याचे दुःख पचवत, या कठीण प्रसंगात जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला व कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी नामदार आठवले यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मानला जात आहे.


