अग्निशमन व आपत्कालीन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला दोन नवीन अग्निशामक वाहने उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून हा पाठपुरावा करण्यात आला असून, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.
संगमनेर शहराची वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण तसेच शहरातील विविध भागांमध्ये निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाची क्षमता वाढविण्याची मागणी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार खताळ यांनी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संगमनेर नगरपरिषदेसाठी नवीन अग्निशामक वाहने मंजूर करण्याची मागणी केली होती.
आमदार खताळ यांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेंतर्गत नगरपरिषदेसाठी दोन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील आग, अपघात तसेच अन्य आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने मदत पोहोचविण्याची नगरपरिषदेची क्षमता वाढणार आहे. नवीन अग्निशामक वाहने उपलब्ध झाल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन विभागाला अधिक सक्षम साधनसामग्री मिळणार आहे.
संगमनेर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन अग्निशामक वाहने उपलब्ध व्हावीत, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दोन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक सक्षम आणि जलद अग्निशमन सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.