संगमनेर मधील पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर शहर आणि तालुक्यात पोलीसदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या गरीब, गरजू व होतकरू युवक-युवतींना योग्य दिशा तसेच आवश्यक सहाय्य मिळावे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन खाकी पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियाना बद्दल शहरात विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत २ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता तसेच अभ्यासाचे नियोजन अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘मिशन खाकी’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या अभियानाची सविस्तर माहिती विनोद सूर्यवंशी सौरभ देशमुख, अभिजीत पुंड, शशांक नामन, कृष्णा हासे, राहुल भोईर, सनी धारणकर, विशाल जोशी, मयूर म्हसे, कृष्णा गांडोळे, अनिकेत चांगले या सर्व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रांना भेटी देत खाकी मिशन अभियाना बद्दलची माहिती दिली . यावेळी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणारे मार्गदर्शन आणि सहाय्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच तुम्हाला काही अडी अडचणी येत असेल तर त्या खाकी मिशन या लिंकमध्ये भरून पाठवा असे आवाहन करण्यात आले आहे
उद्याच्या महाराष्ट्राचे रक्षक आणि खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र मेहनत करणाऱ्या भावी पोलीस योद्ध्यांनो, तुमच्या संघर्षाची आम्हाला जाणीव आहे. पहाटे चार वाजता संपूर्ण जग झोपलेले असताना मैदानावर धावणारी तुमची पावले आणि रात्री अभ्यासिकेत डोळ्यात तेल घालून अभ्यास करणारे तुमचे चेहरे हा तुमचा सर्व संघर्ष आम्हाला ठाऊक आहे. तुमच्या या मेहनतीला यशाची दिशा देण्यासाठी ‘मिशन खाकी’च्या माध्यमातून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत .लवकरच पोलीस भरतीच्या वेळापत्रकासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असून, पोलीस भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. रिक्त झालेल्या सर्व जागा भरण्याच्या दृष्टीने प्रक्रिया राबविली जाणार असल्याने इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तयारीला वेग द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
पैशांची अडचण आड येऊ देऊ नका. असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे , आर्थिक अडचण किंवा योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे गरीब शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील कोणत्याही मुला-मुलीचे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये. अर्ज भरताना अडचण असो, कागदपत्रांची समस्या असो किंवा अभ्यासाचे नियोजन असो, ‘मिशन खाकी’च्या समन्वय कक्षामार्फत आवश्यक मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले. मैदानावर घाम गाळण्याची आणि पुस्तकांवर डोळे रोखून अभ्यास करण्याची जिद्द तुमची असेल, तर आवश्यक प्रशासकीय व शैक्षणिक मदत देण्याची जबाबदारी आमची असेल. पोलीस भरतीची ही प्रक्रिया केवळ नोकरी मिळविण्याची संधी नसून आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न पूर्ण करण्याची आणि समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या संधीचे सोने करा.असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना केले