नागरिकांना दुष्काळासह जाणवू लागली शेती मातीची जाण असणाऱ्या नेतृत्वाची उणीव
संगमनेर । झुंझार न्यूज
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विनाअट शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळाली. सध्याच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र किती जणांना मिळाली हा प्रश्न नागरिकांमध्ये असून दुष्काळी परिस्थितीमध्ये फक्त बैठका आणि घोषणा होत आहे. अशा काळामध्ये माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या एका फोनवर शेतकऱ्यांना थेट 4000 रुपयांची मदत मिळाल्याच्या आठवणी शेतकरी काढत असून आता शेती मातीची जाण असणाऱ्या नेतृत्वाची उणीव महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना जाणवू लागली आहे.

अल निनो च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अत्यंत कमी पाऊस झाला असून दुष्काळाची मोठी चिन्हे दिसू लागली आहेत. 1972 पेक्षाही मोठा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताशी आलेले पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे अशा काळात सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे. मात्र फक्त दुष्काळ पाहणी आणि आढावा बैठका घेतल्या जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही.
अशा वेळी शेतकऱ्यांचे नेते म्हणून देशात ओळख असलेले खा.शरदचंद्रजी पवार यांनी दुष्काळ जाहीर करावा ही मागणी केली त्या पाठोपाठ राज्याचे माजी कृषिमंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आता पंचनामांचा फार्स न करता राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी तसेच शेतीवर आधारित शेतमजुरांची वाईट अवस्था झाली असून त्यांनाही मदत देताना सरकारने शेतमजुरांना मिळणारा रोज द्यावा अशी मागणी केली. याचबरोबर संगमनेरमध्ये मोठा जन आक्रोश मोर्चाही काढला. त्यातून राज्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. मात्र शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळत नाही.
त्यामुळे राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक चिंतातूर आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवापाड जपलेली जनावरे विक्रीस काढली आहे. जनावरे विकताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. धान्याचा तुटवडा आणि पाण्याची कमतरता भासू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार मात्र जाहिरातबाजी आणि बैठकांमध्ये व्यस्त आहे.
अशा काळात सर्व शेतकरी व नागरिकांना काँग्रेस सरकार व त्यामधील मंत्री बाळासाहेब थोरात यांची आठवण येत आहे. याबाबतच्या विविध रिल्स पोस्ट सोशल माध्यमांमधून झळकत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये सातत्याने शेतकऱ्यांना कायम मोठी मदत केली गेली. बाळासाहेब थोरात हे राज्याचे सहा वर्ष कृषी मंत्री होते या काळामध्ये अतिवृष्टी व दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत झाली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात हे चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर होते. शेतकऱ्यांनी आग्रह धरला की सोयाबीनला भरीव मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावरून कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला त्यावर स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सांगितले शेतकऱ्यांना मदत आहे करून टाका. एका फोनवर त्या काळात सोयाबीनसाठी हेक्टरी चार हजार रुपयांची मदत तात्काळ आली.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ही महसूल मंत्री असतानाही शेतकऱ्यांसाठी लढले व सातत्याने शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली. दुष्काळ व अतिवृष्टीच्या काळातही शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली. याची जाणीव आता शेतकऱ्यांना होऊ लागली आहे. अगदी तरुण पिढी सुद्धा रिल च्या माध्यमातून जुन्या आठवणी पुन्हा शेतकऱ्यांना सांगत आहे. काँग्रेस महाविकास आघाडी सरकार ही शेतकऱ्यांचे सरकार होते. आत्ताचे सरकार मात्र भांडवलदारांचे आणि श्रीमंतांचे सरकार आहे याची जाणीव आता जनतेला होऊ लागली आहे.
शेती मातीशी नाळ असणारे नेते सरकारमध्ये असले की शेतकऱ्यांना मोठी मदत मिळते. मात्र आता शेतकऱ्यांचेवाली प्रत्यक्ष सरकार मध्ये नसून घोषणाबाज मंत्री फक्त दुष्काळ पाहणीचे फारच करत असल्याची टीका सर्वसामान्य नागरिक करत आहे. युवा पिढी ही जुन्या कर्तबगार नेत्यांची आठवण काढत असून या नेत्यांच्या नेतृत्वाची उणीव सर्वसामान्य नागरिकांना जाणवत असून दुष्काळासह हे चटके बसत आहेत.
सध्या सोशल मीडियाचा जमाना असून विविध रिल्सच्या माध्यमातून सरकारवर टीका करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना केलेल्या मदतीच्या आठवणी तरुणांनी जाग्या केल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील शेतकरी चिंतेत
लोकनेते बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री, कृषिमंत्री असताना संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळात आणि अतिवृष्टीतही भरपूर मदत झाली. मात्र आता दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा शेतकरी वाऱ्यावर आहे. फक्त बैठका सुरू आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला मात्र संगमनेर तालुक्याला त्यातून जाणीवपूर्वक वगळले तरीही नवीन लोकप्रतिनिधी गप्प आहे. फ्लेक्सबाज पुढारी असलेल्या नवीन लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाने काही होणार नसून शेतकऱ्यांसाठी माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनाच पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. असे सर्व शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे व शेतकऱ्यांसाठी आपण सदैव लढणार असल्याचेही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.





