परवानगीपेक्षा अधिक वाळूची वाहतूक करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हायवा टिपरसह सुमारे २५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. ७ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता फत्याबाद पुलावर, मांडवे (ता. श्रीरामपूर) परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मालुंजा खुर्द (ता. राहुरी) येथील लिलावातील 2 ब्रास वाळू वाहतुकीचा परवाना असताना संबंधित वाहनातून त्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे ६ ब्रास वाळूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. वाहनचालक व वाहनमालक यांनी संगनमत करून विनापरवाना वाळू वाहतूक केल्याचा आरोप आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी टाटा हायवा कंपनीचा टिपर क्रमांक एम. एच. १७ सी . व्ही.१५०३ ताब्यात घेतला आहे.- वाहनाची अंदाजे किंमत: २५ लाख रुपये- जप्त केलेल्या ६ब्रास वाळूची अंदाजे किंमत: १८ हजार रुपये *एकूण जप्त मुद्देमाल: २५लाख १८ हजार रुपये
या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुदनर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तुषार कैलास खर्डे (रा. पाचमोऱ्या, कोल्हार भगवती, ता. राहाता) आणि रामदास जाधव (पूर्ण नाव व पत्ता पोलिसांच्या नोंदीनुसार आडगाव, ता. राहाता) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५०८/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो .हे.कॉ. वाल्मिक पारधी करीत आहेत.