२५ पैकी ११ बसेस आगारात; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

संगमनेर आगारासाठी मंजूर करण्यात आलेल्या २५ इलेक्ट्रिक शिवाई एसटी बसेसपैकी पहिल्या सहा बसेस गुरुवारी (ता. ८) संगमनेरमध्ये दाखल झाल्या होत्या. या बसेसचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस संगमनेर आगारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आगारातील इलेक्ट्रिक बसेसची संख्या ११ झाली असून, या बसेस जिल्ह्यांतर्गत विविध मार्गांवर धावणार आहेत.

आगाराला आधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत परिवहन विभागाकडून संगमनेर आगारासाठी २५ इलेक्ट्रिक शिवाई बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा बसेस संगमनेरमध्ये दाखल झाल्या. त्यांचे आमदार खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. आता त्यापाठोपाठ आणखी पाच बसेस आगारात दाखल झाल्याने इलेक्ट्रिक बससेवेचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या बसेस पुणे, पंढरपूर आणि तुळजापूर या मार्गांवर पाठविण्यात येत आहेत. नव्याने दाखल झालेल्या पाच बसेस जिल्ह्यांतर्गत मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक शिवाई बसेसमुळे इंधनावरील खर्च कमी होण्यासह वायुप्रदूषण कमी करण्यासही मदत होणार आहे. संगमनेर आगारासाठी मंजूर झालेल्या उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने दाखल झाल्यानंतर प्रवाशांना आधुनिक बससेवेचा अधिक लाभ मिळणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *