सरकारने निवड घोषणा न करता अंमलबजावणी करावी —
पंचनाम्यात वेळ घालू नका सरसकट शेतकऱ्यांना मदत करा–
माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दुष्काळाची भयान परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी ,पशुधनासाठी चारा, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने आता पंचनाम्यात वेळ न घालवता सरसकट सर्व दुष्काळग्रस्तांना भरीव मदत केली पाहिजे. हे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून आता घोषणा नको तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करा अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे मा. महसूल कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

पठार भागातील हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी ,कवठे मलकापूर, सुळकेवाडी ,चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब ,पिंपळगाव देपा, या गावांमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पाहणी करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला यावेळी समवेत सभापती शंकरराव खेमनर, बाळासाहेब सागर, सौ मीराताई शेटे, जयराम ढेरंगे ,सुजित खेमनर ,सुदाम सागर, शिवाजी साकुरे ,शशिकांत बेरड ,लक्ष्मण गीते, पांडुरंग सागर बाबासाहेब भोसले ,भास्कर कारंडे, निवृत्ती गि-हे, राहुल गंभीरे रोहिदास मुंडे भाऊसाहेब गांजवे जाकीर मोमीन , पोपट घाडगे ,केके पावडे ,सरपंच हौशीराम खेमनर, तुकाराम गुळवे ,साहेबराव बारवे, नाना गुळवे यांच्यासह कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात सोयाबीन भुईमूग बाजरी या पिकांची पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला .
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण महाराष्ट्रात अत्यंत अवघड परिस्थिती आहे. हाताशी आलेली पिके करपून गेली आहे. सोयाबीन काढण्याची परिस्थिती नाही. शेतीचे उत्पन्न होणार नाही. चारा नसल्याने पशुधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा याचबरोबर हातावर काम करणारे अनेक शेतमजूर आहेत ज्यांना दुष्काळामुळे रोजगारी नाही. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. अशा सर्व नागरिकांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे . शेतमजुरांना मिळणारा रोजगार सुद्धा दिला पाहिजे. पाणी चारा यांची व्यवस्था करा त्याचबरोबर पंचनामांमध्ये वेळ न घालवता तातडीने सरसकट मदत करावी.
ग्रामीण भागातील गावांमध्ये अनेक अकुशल कामगार आहेत. त्यांचे मागील सहा महिन्यापासून चे पगार शासनाने दिले नाहीत. त्यांच्या जेवणाचा प्रश्न आहे. मुलांच्या शाळेचा प्रश्न आहेत. अनंत अडचणी आहेत. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे . इतकेच काय तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा मागील सहा महिन्यापासून नागरिकांना दिलेली नाही अशी वाईट अवस्था आहे.
हातावर असलेल्या नागरिकांचे पैसे सरकार देऊ शकत नाही याचा अर्थ हे सरकार कुचकामी ठरले आहे. घोषणा मात्र मोठमोठ्या होत आहेत. आता निव्वळ घोषणा नको निर्णय करावा व तातडीने अंमलबजावणी करावी आणि राज्यातील शेतकरी व दुष्काळग्रस्तांना भरी मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली आहे.
याप्रसंगी सभापती शंकर पा. खेमनर म्हणाली की, राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि सध्या फक्त बैठकांमध्ये पदाधिकारी व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली जात नाही. काँग्रेस आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी सह दुष्काळ व अतिवृष्टीतही मोठी मदत दिली जायची. पिक विमा दिला जायचा शेतकऱ्यांच्या मदतीबाबत संगमनेर तालुका पुढे असायचा मात्र आता या उलट सर्व घडते आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना नेतृत्वाची चटके बसू लागले असल्याचे ते म्हणाले.
तर जयराम ढेरंगे म्हणाले की परिस्थिती कोणतीही असली तरी लोकनेते बाळासाहेब थोरात हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. हाच एक दिलासा पठार भागातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी महिला व युवकांशी संवाद साधला .अनेक महिलांनी व्यथा मांडताना त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले .साहेब तुम्हीच आता आम्हाला वाचवा. हे सरकार काही कामाचे नाही. साहेब तुम्हीच आमचे सरकार आहात यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या महिला व नागरिकांना दिलासा देत आपण तुमच्या पाठीशी आहोत तुमच्यासाठी सातत्याने संघर्ष करू असे सांगितले.

शेतकरी नेता दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे नेते म्हणून राज्याला परिचित आहेत. सोमवारी दिल्लीमध्ये खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये ते सहभागी होते. यापूर्वी राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा म्हणून त्यांनी सातत्याने मागणी केली असून संगमनेर मध्ये मोठा मोर्चा काढला. त्यानंतर राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या मोर्चा, पुणे येथील एमपीएससीचे आंदोलन, दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर शेतकऱ्यांचे नेते असलेले बाळासाहेब थोरात ही रात्री उशिरा दिल्लीतून परतल्यानंतर सकाळी आठ वाजता पठार भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.

