झुंझार न्यूज

मुंबई : महाराष्ट्र आणि ब्रिटन यांच्यातील औद्योगिक, तांत्रिक व व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनच्या राष्ट्रीय व प्रादेशिक नेतृत्वाच्या शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत प्रगत उत्पादन क्षेत्र, वित्तीय सेवा, जीवन विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ तंत्रज्ञान या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस ब्रिटनचे बिझनेस अँड ट्रेड विभागाचे सचिव जोनाथन रेनॉल्ड्स, ग्रेटर मँचेस्टरच्या महापौर बेव्ह क्रेग, लिव्हरपूल सिटी रिजनचे महापौर स्टीव्ह रोदरम आणि नॉर्थ ईस्टच्या महापौर किम मॅकगिनेस उपस्थित होते. महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.

ब्रिटिश कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आमंत्रण

संशोधन, अभियांत्रिकी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) स्थापन करू इच्छिणाऱ्या ब्रिटिश कंपन्यांनी महाराष्ट्रात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अशा कंपन्यांना स्थानिक भागीदारी आणि कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

जीवन विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सहकार्य

ग्रेटर मँचेस्टरमधील जीवन विज्ञान आणि प्रगत साहित्य तंत्रज्ञानातील क्षमता महाराष्ट्राच्या औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी जोडता येऊ शकतात. या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि औद्योगिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

मुंबई-लिव्हरपूलदरम्यान सागरी व्यापाराला चालना

मुंबई आणि लिव्हरपूल या दोन्ही शहरांची सागरी व्यापाराशी संबंधित ओळख लक्षात घेता, बंदरे, मालवाहतूक, लॉजिस्टिक्स आणि समुद्रकिनारी भागांचा पुनर्विकास या क्षेत्रांत सहकार्याच्या संधी तपासण्यावर चर्चा झाली.

तसेच, नॉर्थ ईस्ट भागातील वाहन उद्योग आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील क्षमतांचा महाराष्ट्राच्या औद्योगिक प्राधान्यांशी मेळ घालण्यावर भर देण्यात आला. यासाठी सुंदरलँड आणि पुणे यांच्यात औद्योगिक संबंध व सहकार्य विकसित करण्याची शक्यताही तपासली जाणार आहे.

ठरावीक कालमर्यादेत सहकार्य पुढे नेण्यावर भर

या बैठकीत झालेल्या चर्चेचे प्रत्यक्ष सहकार्यामध्ये रूपांतर करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या पथकांनी ठरावीक कालमर्यादेत पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिटनसोबतचे सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *