{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदर्शनाचे उद्घाटन; अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि रोजगाराच्या संधींची मिळणार माहिती

संगमनेर । झुंझार न्यूज

 

जागतिक अन्नदिनाचे औचित्य साधून अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार, दि. १६ व शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘फूड एक्स्पो २०२६’ या भव्य अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अमृतवाहिनी शिक्षण संकुलातील वसंतदादा क्रीडा संकुल येथे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी दिली आहे

या प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाच्या विविध संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. अन्नाची गुणवत्ता व सुरक्षितता, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, अन्नाची नासाडी कमी करण्याचे उपाय तसेच विविध कृषी उत्पादनांपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याच्या संधींची माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे.

शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतात. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्य वाढविल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच ग्रामीण भागात उद्योग आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण, महिला बचतगट आणि नवउद्योजकांसाठी अन्नप्रक्रिया उद्योग हे स्वयंरोजगाराचे प्रभावी माध्यम ठरू शकतात. या दृष्टीने ‘फूड एक्स्पो २०२६’ हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थी, शेतकरी, अन्नप्रक्रिया उद्योजक आणि नागरिकांना अन्नतंत्रज्ञानातील नवनवीन संकल्पना जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी, व्यवसायाच्या नव्या संधी आणि रोजगारनिर्मिती यांविषयी उपयुक्त माहिती या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे ,डॉ जयश्रीताई थोरात संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख पदाधिकारी, मान्यवर अतिथी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी, शेतकरी, महिला बचतगट, अन्नप्रक्रिया उद्योजक तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन आधुनिक अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी आणि उपलब्ध व्यावसायिक संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *