राजघराण्याची पार्श्वभूमी, साहित्याची आवड आणि साधेपणा यांचा सुंदर संगम; राज्यपालांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळाल्याची भावना
झरेकाठी । झुंझार न्यूज
विमान प्रवासादरम्यान महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा यांची श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त अध्यक्षा तथा श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या विश्वस्त कु. अनुराधा पुष्पलता गोविंदराव आदिक यांची स्नेहभेट झाली. या भेटीत राज्यपालांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, साहित्याविषयीची आवड आणि विविध क्षेत्रांतील त्यांचे योगदान याविषयी जाणून घेण्याची संधी मिळाल्याची भावना अनुराधा आदिक यांनी व्यक्त केली.
त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू देव वर्मा हे केवळ राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व नसून साहित्याची विशेष आवड असलेले संवेदनशील व्यक्ती म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्ये लेखन केले असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साहित्यिक दृष्टिकोन आणि सार्वजनिक जीवनातील अनुभव यांचा संगम पाहायला मिळतो.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बॅडमिंटन क्षेत्रातील संघटनात्मक कार्यातही योगदान दिले आहे. विविध क्षेत्रांतील त्यांचा अनुभव आणि कार्याची व्याप्ती यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
या स्नेहभेटीनंतर आनंद व्यक्त करताना अनुराधा आदिक म्हणाल्या की, राजघराण्याची पार्श्वभूमी असूनही जिष्णू देव वर्मा यांचा साधेपणा विशेष भावतो. त्यांच्या वागणुकीतून आणि विचारांतून त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख होते. विमान प्रवासात त्यांच्यासारख्या अनुभवी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची भेट होणे हा आनंदाचा क्षण होता. त्यांच्याशी झालेल्या भेटीतून अनेक गोष्टी शिकण्याची आणि नवी प्रेरणा घेण्याची संधी मिळाली.
सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींच्या सहवासातून मिळणारे विचार आणि अनुभव हे नेहमीच मार्गदर्शक ठरतात. या भेटीमुळे आपल्याला समृद्ध करणारा अनुभव मिळाल्याचेही अनुराधा आदिक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नमूद केले.
कु. अनुराधा पुष्पलता गोविंदराव आदिक या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त अध्यक्षा असून, श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या विश्वस्त म्हणूनही त्या कार्यरत आहेत. तसेच त्या महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, कृषी आणि सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा अनेक मान्यवरांशी संपर्क येत असतो.
विमान प्रवासातील ही स्नेहभेट म्हणजे दोन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांचा अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारा आनंददायी क्षण ठरला.