मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेकडे लक्ष; विखे पाटील, थोरात आणि शिंदे यांच्या बैठकीबाबत उत्सुकता

 

नगर । झुंझार न्यूज 

 

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील अर्ज माघारीची मुदत जवळ येत असताना जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नाराजांची मनधरणी, आश्वासनांची देवाणघेवाण आणि संभाव्य तडजोडी यांवर राजकीय नेत्यांचा भर आहे. आता ही निवडणूक केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नसून, तिचे पडसाद मुंबईतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचले आहेत.

अर्ज माघारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने कोणत्या मतदारसंघात तडजोड करायची, कोणाला माघार घ्यायला लावायची आणि संभाव्य बंडखोरी कशी रोखायची, यासाठी नेत्यांची धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर जिल्ह्यातील निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांच्याशीही चर्चा किंवा संपर्क होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील चर्चेनंतर नगरमध्ये बैठक?

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर असल्याने उर्वरित उमेदवारांना माघार घेण्यासाठी तयार करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर नगरमध्ये प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.

श्रीगोंद्यात तडजोडीची शक्यता; पारनेरचा प्रश्न कायम

श्रीगोंदा मतदारसंघात तडजोडीचा मार्ग निघण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी पारनेरमधील उमेदवारीचा प्रश्न अद्याप कायम आहे. खासदार नीलेश लंके यांच्यासाठी पारनेरची जागा सोडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाचा विरोध असल्याची चर्चा आहे.

पारनेरमधील निर्णय घेताना विद्यमान आमदारांना विश्वासात घेणार का, तसेच अन्य उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी तयार केले जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या मतदारसंघातील निर्णयाचा परिणाम जिल्ह्यातील इतर जागांवरील तडजोडींवरही होऊ शकतो.

पक्षांतर्गत गटबाजीमुळे पेच

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध पक्षांमध्ये प्रस्थापित आणि नव्याने पुढे आलेले नेतृत्व यांच्यात मतभेद असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार किरण लहामटे यांच्यासह काही नेत्यांच्या भूमिका चर्चेत आहेत. दुसरीकडे, आमदार आशुतोष काळे, आमदार काशिनाथ दाते आणि आमदार संग्राम जगताप यांच्याशी संबंधित राजकीय समीकरणांचाही विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. भाजपमध्येही उमेदवारी आणि मतदारसंघनिहाय तडजोडींबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सर्वच पक्षांतील गट-तट आणि स्थानिक समीकरणांमुळे अर्ज माघारीचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे.

शिवसेनेची भूमिका महत्त्वाची

शिवसेनेतील नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. काही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असली, तरी काही उमेदवारांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नसल्याचे चित्र आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच काही मतदारसंघांतील पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांतील कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. कोणत्या जागेवर माघार होणार, कोणत्या ठिकाणी थेट लढत होणार आणि कोणत्या मतदारसंघात तडजोडीचे सूत्र ठरणार, याबाबत उत्सुकता आहे.

अर्ज माघारीची अंतिम मुदत जवळ येत असल्याने आगामी दोन दिवसांत मुंबई आणि अहिल्यानगरमधील चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *