शहागडाचा इतिहास देश-विदेशात पोहोचविणार; दीड कोटींचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू – आमदार अमोल खताळ

 

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक शहागडाचा गौरवशाली इतिहास केवळ तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रासह देश-विदेशात पोहोचविण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. शहागडावर आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या महोत्सवासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

पेमगिरी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहाला आमदार खताळ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पेमादेवीची महाआरती केली. त्यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार खताळ म्हणाले, की माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींची सुरुवात या परिसरातून झाली आहे. त्यामुळे या भूमीच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आमदार झाल्यानंतर शहागडाच्या विकासाचा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन ते तीन वेळा मांडला. या गडाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा आणि या ऐतिहासिक वारशाला योग्य स्थान मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

ऋषिपंचमीच्या दिवशी दरवर्षी शहागडावर कार्यक्रम आयोजित केला जातो. याच कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मुंबईला जावे लागले होते. या प्रयत्नांना यश आले असून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने ऐतिहासिक महोत्सवासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, एवढ्या निधीत भव्य स्वरूपाचा महोत्सव आयोजित करणे पुरेसे ठरणार नसल्याने सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहागडावर तीन ते चार दिवसांचा भव्य ऐतिहासिक महोत्सव आयोजित करण्याचा मानस आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही शहागडावर आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत या गडाचे ऐतिहासिक महत्त्व राज्यासह देशभर पोहोचविण्याचा संकल्प असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजनांसाठी प्रयत्नशील

पेमगिरी परिसरातील पाणीप्रश्नावर तात्पुरत्या उपाययोजना करून हा प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करण्याची गरज आहे. मोरदरा पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, पाऊस पडूनही पाण्याची योग्य पद्धतीने साठवण होत नसेल, तर पाणीटंचाई कायम राहते. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या परिसराचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणीसाठा वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास सुरू आहे. आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास भविष्यात केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे, तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सोडविणे शक्य होईल.

– अमोल खताळ( आमदार)
……………………………………………………

आमदार खताळ यांना मंत्रिपदाची संधी मिळावी

शहागडावरील पथदिवे सुरू करण्याबाबत आमदार अमोल खताळ यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. आता त्यांच्याच माध्यमातून शहागडाचा सर्वांगीण विकास व्हावा, ही आमची अपेक्षा आहे. पेमगिरी गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा विकास व्हावा आणि पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात. यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल. तसेच, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमदार खताळ यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.

— दिलीप कोल्हे, पेमगिरी

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *