संगमनेर तालुक्यात यंदा दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले असून, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार तसेच आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अशा कठीण परिस्थितीतही गोरगरीब कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमोल खताळ यांनी कर्जुले पठार येथील येठेवाडी, गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी तसेच डोळासणे येथील दुबेवाडी परिसरातील आदिवासी व गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा, साड्या, मिठाई आणि फटाक्यांचे वाटप केले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत वंचित आणि गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यात आला.
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि गोरगरीब कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र महायुती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. दुष्काळाच्या संकटात शासनाच्या मदतीसोबतच समाजातील प्रत्येक घटकाने गरजू कुटुंबांना सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केल्यास संकटग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे दुष्काळात गरजू नागरिकांना सहकार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
दुष्काळाची तीव्रता खऱ्या अर्थाने डिसेंबर-जानेवारीनंतर जाणवू लागेल. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता भासेल, त्या गावांमध्ये शासनाच्या माध्यमातून टँकर सुरू केले जातील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीनेही गरजेनुसार खासगी टँकर सुरू करून दुष्काळग्रस्त गावांना मदत केली जाईल, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, कर्जुले पठारचे सरपंच किरण भागवत माजी सरपंच रवींद्र भोर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
येठेवाडी, काटवणवाडी व दुबेवाडी या वाड्या-वस्त्यांवर स्वातंत्र्यानंतरही वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली नव्हती. तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर या भागातील वीजपुरवठ्यासाठी आवश्यक असलेली विद्युत रोहित्रे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ही रोहित्रे तातडीने कार्यान्वित करून वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच या वस्त्यांमधील अंधार दूर होऊन नागरिकांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल.