संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अर्थात राजहंस दूध संघामध्ये दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी दूध संघाच्या अधिकारी, कर्मचारी, संचालक, दूध उत्पादक शेतकरी आणि सभासदांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, दीपावलीमध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीचे पूजन करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. प्रत्येक व्यक्ती वर्षभर कष्ट आणि धावपळ करत असते. मात्र दीपावलीचे हे चार दिवस आनंद, उत्साह आणि समाधान देणारे असतात. दीपावली हे प्रकाशाचे, बंधुभावाचे, प्रेमाचे आणि आनंदाचे पर्व आहे. यावर्षी प्रदूषणविरहित दिवाळी साजरी होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्याच्या विकासाचा आढावा घेताना थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा कष्टातून उभा राहिलेला तालुका आहे. कष्टातूनच लक्ष्मीची पावले घरात पडतात आणि त्यातून समृद्धी निर्माण होते. ही समृद्धी आपण जपली पाहिजे. एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा संगमनेर तालुका आज प्रगतशील तालुका म्हणून नावारूपाला आला आहे. या वाटचालीमध्ये जुन्या पिढीचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
सहकारी साखर कारखान्याने कायमच तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. दुष्काळी भागात कारखान्याची उभारणी झाल्यानंतर परिसरात पाईपलाईनचे जाळे निर्माण झाले, ऊस लागवड वाढली, वीज मोटारींची जोडणी उपलब्ध झाली. शेतकऱ्यांच्या कष्टातून आणि सहकाराच्या बळावर तालुक्याचा विकास टप्प्याटप्प्याने पुढे गेला. ही विकासाची परंपरा पुढेही कायम ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामांचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, आपण निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. सुदैवाने यावर्षी धरण भरले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे.
यंदाचे वर्ष दुष्काळाचे असून आगामी काळात चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येणारे संकट मोठे असले तरी त्यातून सावरण्याची शक्ती सर्वांना मिळावी, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे भावनिक प्रतिपादन त्यांनी केले .
यावेळी राजहंस दूध संघाचे माजी चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह देशमुख म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील सहकार चळवळ आदर्श ठरली आहे. दूध संघ, साखर कारखाना आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून संगमनेरच्या बाजारपेठेत सुमारे १६० कोटी रुपये आले आहेत. त्यामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली असून व्यापार आणि आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळाली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्राने शहराच्या आर्थिक समृद्धीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी आणि दूध उत्पादकांना आर्थिक बळ मिळाले असून दुष्काळी परिस्थितीतही ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळाला आहे. सहकाराची ही ताकद संगमनेरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
या लक्ष्मीपूजन कार्यक्रमास डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. हसमुख, दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, कार्यकारी अधिकारी डॉ. सुजित खिलारी, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले यांच्यासह दूध संघाचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार, कष्ट आणि एकजुटीच्या बळावर संगमनेर तालुक्याने दुष्काळातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. ही विकासाची परंपरा जपत शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार चळवळ अधिक बळकट करण्याचा संदेश या दीपावली लक्ष्मीपूजन कार्यक्रमातून देण्यात आला.