विवेकानंद पाटील यांचे ‘विद्यार्थ्यांचे झुंजार नेतृत्व’ या विषयावर व्याख्यान
सत्यजितदादा तांबे, यशश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील खळी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयात बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे, माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, स्नेहबंध अधिक दृढ करणे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
या मेळाव्यास आमदार सत्यजित तांबे ( नाशिक पदवीधर मतदारसंघ), युवक कॉग्रेस संगमनेर तालुकाध्यक्ष जयश्रीताई थोरात , योगिता चांदे (विद्यार्थिनी झुंजार नेतृत्व) राजहंस दूध संघाचे व्हा चेअरमन राजेंद् चकोर , विक्रम थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात प्रमुख व्याख्याते म्हणून युवा नेतृत्व विवेकानंद पाटील यांचे ‘विद्यार्थ्यांचे झुंजार नेतृत्व’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि ध्येय साध्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टीने हे व्याख्यान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
माजी विद्यार्थी मेळावा म्हणजे केवळ जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट नव्हे, तर शाळेने दिलेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन, बालपणीच्या आठवणी आणि आयुष्यातील यशस्वी प्रवास यांना उजाळा देणारा एक आनंददायी सोहळा आहे. या निमित्ताने माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊन शाळेशी असलेले नाते अधिक घट्ट करतील.
या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती, खळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.