संगमनेर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटाचा सामना करीत आहेत. पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना यंदाची दिवाळी आनंदात साजरी करणेही शक्य झाले नाही. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही यंदाची दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक टंचाईग्रस्त भागात शासनाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होतीलच; मात्र शिवसेनेच्या वतीनेही आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयात दिवाळीनिमित्त आमदार अमोल खताळ यांनी पत्नी नीलम खताळ यांच्यासह लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. खताळ म्हणाले कि दुष्काळामुळे ज्या भागांतील नागरिकांना दिवाळी सण साजरा करणेही कठीण झाले आहे, अशा भागांमध्ये आपण स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना धीर देणे आणि संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे.
संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आगामी काळात वृक्षसंवर्धनाबरोबरच जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून त्याचे योग्य नियोजन करणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि भूजलपातळी सुधारण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत, असेही आमदार खताळ यांनी सांगितले.
“तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता किती आहे, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, तसेच शेतकरी आणि पशुधना साठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, याचा अधिकाऱ्यांकडून दररोज आढावा घेतला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत या मायबाप जनतेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू. सर्वांच्या सहकार्याने या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ.”