नाशिक : झुंजार न्यूज

 राज्यभरातील रस्ते, वाडया, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला असून यामुळे सामाजिक बदलांची सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात २९०० हून अधिक जातिवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून नाशिक विभागाचे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या विभागीय समितीची बैठक व तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ व इतर अनुषंगिक विषयांचा आढावा बैठक घेण्यात आला. त्यावेळी आयुक्त गमे बोलत होते.

सदर बैठकीस नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील, विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विभागातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक,विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, यांच्यासह विविध यंत्रणांचे कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते.

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील २९०४ जातीवाचक नावे बदलण्यात आले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १६९, नगरपालिका क्षेत्रातील २६६ व ग्रामपंचायत क्षेत्रातील (ग्रामीण) २४६९ याप्रमाणे बदलण्यात आली आहे.
तृतीयपंथी कल्याण समितीच्या बैठकीत तृतीयपंथीयांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी उपाययोजना करण्याचे व त्यांच्यासाठी ओळखपत्र वाटप करण्यासाठी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश आयुक्त श्री गमे यांनी यावेळी दिले.

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील त्याबाबत जिल्हावार आढावा यावेळी घेण्यात आला त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांना देण्यात आले अर्थसहाय व त्या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे यावे श्री गमे यांनी सूचित केले.

अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाने याबाबत व्यापक स्तरावर जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी व जास्तीत जास्त समाज घटकांचा त्यात समावेश करून जनजागृती होणे आवश्यक असल्याचे आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांनी सदर बैठकीत शेवटी सुचित केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed