जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त चिंचोली गुरव येथे 3 हजार रोपांचे वृक्षारोपण
संगमनेर : झुंजार न्यूज
आपला देश सर्वच क्षेत्रात प्रगती करत असतांना पर्यावरणाकडे विशेष लक्ष देवून वृक्षारोपन व पर्यावरण संवर्धनाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.दंडकारण्य अभियान या पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत जनतेने सक्रीय सहभाग घेऊन ‘ एक व्यक्ती एक झाड ’ही संकल्पना प्रभावीपणे राबवावी असे आवाहन पर्यावरण दिन (5 जून) निमित्त सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

तालुक्यातील चिंचोली गुरव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त 3 हजार रोपांचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, जि.प.सदस्य महेंद्र गोडगे, चिंचोली गुरवचे सरपंच विलास अण्णा सोनवणे,सौ.सुमनताई गोडगे,उपसरपंच संगिता बर्डे, तिगावचे सरपंच डी.के,सानप, ग्रामसेवक सोमवंशी, विलास सोनवणे, राजू सोनवणे , विजय गोडगे, पोपट गोडगे, के.डी.सोनवणे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि,ग्लोबल वार्मिंगचा परिणाम म्हणून दुष्काळ, तापमानात झालेली वाढ व पर्जन्यातील घट ह्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापासून सजीवसृष्टीच्या रक्षणाबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरु केले. अभियानाचे हे सतरावे वर्ष आहे. याकामात फादर हर्मन बाकर यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या याच कामाची आपण प्रेरणा घेतली आहे. त्यामुळेच पिंपारणे येथील डोंगरला आपण हर्मन हील असे नाव दिले आहे. या अभियान काळात गावागावात व संगमनेर शहरात सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्याच्या दूतर्फा रोपांची लागवड करण्यात येणार आहे. शहरातील मोकळया जागा निवडून त्या ठिकाणी शोभीवंत व आकर्षक वृक्षांची तसेच देवस्थान परिसरातही रोपांची लागवड करण्यात येईल.

यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या कि, दंडकारण्य अभियानाची व्याप्ती वाढत असून त्यात सर्वांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. शहरातील नागरिकांनी परसबागेत फूलझाडांची,वेलींची लागवड करावी तसेच आपल्या आवडीचे एक झाड लावावे.त्यासाठी रोपांचे सहकार्य केले जाईल.संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेने दंडकारण्य अभियानात सक्रीय सहभागी होऊन प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून ‘ एक व्यक्ती एक झाड ’ही संकल्पना यशस्वीपणे राबविल्यास हरितसृष्टीचे स्वप्न सत्यात उतरुन भावी पिढीसाठी अनमोल ठेवा निर्मान करावा असे अवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जि.प.सदस्य महेंद्र गोडगे म्हणाले कि, आ.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सहकार, शिक्षण,पर्यावरण अशा विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. पर्यवरणाचा समतोल रहावा म्हणून सुरु करण्यात दंडकारण्य अभियान आता मोठी लोकचळवळ झाले आहे. आगामी काळात गावातील गट – तट विसरुन सर्वांनी एकत्र येत गावच्या व तालुक्याच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी सौ.सुमनताई गोडगे, पोपट गोडगे,विलास मास्तर सोनवणे यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल गोडगे यांनी केले तर आभार विलास सोनवणे यांनी मानले. यावेळी युवक, महिला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

